Ajit pawar Sharad Pawar Jitendra Awhad : लोकसभा निवडणुकीपासून अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करणं टाळताना दिसत आहे. शरद पवारांना दैवत मानत आलोय, असेही ते काही दिवसांपूर्वी म्हणालेले. त्यानंतर आता 'मी शरद पवारांच्या डोळ्यांत डोळे घालूनही पाहू शकत नाही, मी मान खाली घालेन', असे अजित पवार म्हणाले. त्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी डिवचले. गेल्या काही दिवसांपासून विरोधक अजित पवार एजन्सीच्या सांगण्यावरून बोलताहेत असे दावे करत आहेत. त्यावर बोट ठेवत आव्हाडांनी लक्ष्य केले.
अजित पवार शरद पवारांबद्दल काय बोलले?
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, "शरद पवार माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय बोलणार? मी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालूनही पाहू शकत नाही. मी मान खाली घालेन", असे अजित पवार म्हणाले. त्याच्या या विधानाची चर्चा होत असताना आता जितेंद्र आव्हाडांनी डिवचले.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, "राष्ट्रवादी पक्षासाठी त्यांनी केलेली मेहनत, कॅन्सरच्या ऑपरेशननंतर त्यांनी विदर्भात 10 दिवसात सुरु केलेला प्रचार, तपमान ४६ डिग्री… २००४, असे अनेक प्रकार."
त्यांचा अपमान कुणी केला? आव्हाडांचा पवारांना सवाल
"पण वय झाले घरी बसा हे कोण बोलले? त्यांचा अपमान कुणी केला? त्यांची अस्वस्था जाणवली नाही का? पक्ष आणि चिन्ह चोरणारा चोर कोण? आता ही नवीन स्क्रिप्ट आरोरानी लिहून दिलेली दिसते", असे म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
निकालानंतर अजित पवारांची सौम्य भूमिका
लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार थेट शरद पवारांना लक्ष्य करताना दिसत होते. निकालानंतर विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालानंतर अजित पवारांची भूमिका बदललेली दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांना सोडल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले होते की, मी शरद पवारांना दैवत मानत आलो आहे. अजित पवारांच्या शरद पवारांबद्दलची भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.