मीरा राेड : भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांना पक्षातून काढण्याची नैतिकता दाखवावी. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत म्हणून पोलीस आणि सरकारविरोधात निदर्शनाचा कांगावा करू नये, अशी जळजळीत टीका शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत व गटनेत्या नीलम ढवण यांनी केली आहे. सावंत यांनी महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या भाजपच्या मंडळींवर कठोर कार्यवाहीची मागणी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
सावंत व महिला आघाडीने तर अत्याचाराची यादीच मांडली आहे. शहरातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. पालिकेच्या अलगीकरण केंद्रात सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. हा ठेकेदार भाजपच्या स्थानिक नेत्याच्या जवळचा आहे, असे सांगण्यात आले. गुन्हे दाखल असलेल्या बहुतांश प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना अद्दल घडेल, अशी शिक्षा व्हावी. ज्या प्रकरणात गुन्हे दाखल नाहीत, त्याची सखोल चौकशी करावी.
ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते सध्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत आणि पक्षाने त्यांना कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार असताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला अडवले कुणी आहे? सरकार तुमचे आहे, मग करा कारवाई. लॉज, ऑर्केस्ट्रा बार कुणाचे आहेत, याची चौकशी होऊन कारवाई व्हायला पाहिजे. - हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजप