नवी दिल्ली - देशभर स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चंदीगडमधल्या सेक्टर 15 मधील काँग्रेस भवन ते सेक्टर 25 पर्यंत पंजाब युवक काँग्रेसचे कार्यकर्तें आणि नेत्यांकडून एका विशाल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. नवनियुक्त पंजाब (Punjab) काँग्रेस (Congress) अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.
"निवडणुकीदरम्यान शोपीससारखं वापरलं जातं आणि निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना बाजूला केलं जातं" असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना "पंजाबवर प्रेम करण्याऱ्यांना निवडणुकीदरम्यान शोपीससारखं वापरलं जातं. निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना बाजूला केलं जातं. त्याऐवजी नफा कमवण्यात रस घेण्याऱ्या लोकांना घेतलं जातं. मी तुम्हाला शब्द देतो. मी तुमच्यातील गुणवत्तेचा आदर करेन आणि तरुणांचा सन्मान करेन' असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनताच सिद्धू यांच्या स्वागतासाठी अमृतसरमध्ये शेकडो कार्यकर्ते, चाहत्यांनी गर्दी केली होती.
गर्दीमध्ये सिद्धू यांच्या पायाला दुखापत झाली. उजव्या पायाच्या बोटातून रक्त वाहत होते, तरी देखील त्यांनी रोड शो पूर्ण केला होता. रोड शो वेळी सिद्धूंच्या उजव्या पायाला जखम झाली. या नखातून रक्त वाहत होते. तरीदेखील सिद्धू यांनी जखमी पायाने 129 किमीचा प्रवास केला. या दरम्यान सिद्धू यांनी फगवारा, जालंधर आणि अमृतसरच्या नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान, सिद्धू यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय दिल्लीतून आलेला असला तरीदेखील पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे
अमरिंदर सिंग यांनी जोवर सिद्धू हे त्यांनी केलेल्या आरोपांवर आणि कुरापतींवर माफी मागत नाहीत, तोवर त्यांना भेटणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे जरी सिद्धू यांना अध्यक्षपद मिळाले असले तरी कॅप्टन आणि बाजवा यांचा विरोध सहन करावा लागणार आहे. यामुळे सिद्धू हे या विरोधात, असहकारात पक्षाचे काम कसे करतात यावर देखील अनेकांचे लक्ष असणार आहे. सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या गोटातील जवळपास 26 आमदारांची भेट घेतली होती. यामुळे कॅप्टन समर्थक आमदार सिद्धू यांच्याशी जुळवून घेतील का, घेतलेच तर त्यांच्यावर कॅप्टनची वक्रदृष्टी होईल का, असे प्रश्न पंजाबच्या राजकारणात डोकेवर काढणार आहेत.