नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूवर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जीतनराम मांझी यांच्या HAM पक्षाने या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. HAM चे प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी या प्रकरणात एलजीपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर संशय घेतला आहे. यानंतर आता चिराग पासवान यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
"एखाद्या मुलाबद्दल जे लोक अशाप्रकारची विधानं करताहेत, त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी. मी मांझी यांना फोनद्वारे माझ्या वडिलांच्या गंभीर प्रकृतीबाबत माहिती दिली होती. मात्र तरी देखील ते माझ्या वडिलांना पाहण्यासाठी आले नाही. आता ज्या प्रकारे मांझी माझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत. रुग्णालयात असताना त्यांनी इतकी काळजी का नाही दाखवली? प्रत्येकजण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करत आहे. ते जिवंत असताना त्यांची भेट घेण्यासाठी का कोणी कष्ट घेतले नाहीत?"असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
चिराग पासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट देखील केले आहे. "नितीश कुमार हे प्रचाराला विकासाच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठी माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. माझा आग्रह असेल की, पुढील सभेत जेव्हा पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेण्यासाठी जाल तेव्हा माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांबाबत नक्की विचारून घ्यावं. माझ्या वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मोदीजी त्यांच्या सोबत होते" असं पासवान यांनी म्हटलं आहे.
रामविलास पासवान यांच्या मृत्यूचं षडयंत्र?; मुलगा चिरागवर संशय, न्यायालयीन चौकशीची मागणी
हिंदुस्तान अवाम मोर्चाचे डॉ. दानिश रिजवान यांच्या नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, देशातील दलितांचे मोठे नेते आणि तुमच्या मंत्रिमंडळातील सहकारी रामविलास पासवान हे काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला, शोककळा पसरली, आजही त्यांच्या आठवणीने आमचं मन गहिवरुन जाते. परंतु दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हे रामविलासजींच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडीओ शूटींग करताना दिसतात. या व्हिडीओत ते हसताना, वारंवार रिटेक घेताना दिसत होते त्यामुळे त्यांच्या या वागणुकीवर प्रश्न निर्माण होत आहेत.
"...तर नितीश कुमार गजाआड असतील", चिराग पासवान यांचा हल्लाबोल
चिराग पासवान यांनी याआधी जेडीयू (JDU) वर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. "लोक जनशक्ती पार्टी जर सत्तेत आली तर नितीश कुमार हे गजाआड असतील" असं चिराग पासवान यांनी म्हटलं होतं. चिराग पासवान यांनी एका रॅलीमध्ये "जर आम्ही सत्तेत आलो, तर नितीश कुमार आणि त्यांचे अधिकारी गजाआड असतील" असं म्हटलं होतं. बक्सरच्या डुमरावमधील एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राज्य सरकारवर निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले. बिहारमध्ये दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. अवैध दारूची मोठ्याप्रमाणावर विक्री होत असल्याचं म्हटलं होतं. नितीश कुमार मुक्त सरकारसाठी लोक जनशक्ती पार्टीने भाजपा समर्थकांकडे देखील मतं मागितली होती.