'राफेलमध्ये दिलेले हजारो कोटी अंबानीकडून काढून घेऊन गरिबांना देऊ'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:11 AM2019-04-20T05:11:29+5:302019-04-20T05:11:47+5:30
काँग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेष आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे.
दादा जनवाडे
निपाणी (जि. बेळगाव) : काँग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेष आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळे सत्य व न्याय हवा की विद्वेष , खोटेपणा हे ठरवून मतदान करा असे आवाहन कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबानीचे चौकीदार आहेत. कॉँग्रेस सत्तेवर आल्यास राफेल सौद्यात देण्यात आलेले हजारो कोटी अनिल अंबानी यांच्याकडून काढून घेवून शेतकरी व गरीब लोकांना देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
चिक्कोडी येथे कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, असे सांगितले तर ते याला तयार होत नाहीत; पण अनेक उद्योगपतींची कर्जे त्यांनी माफ केली आहेत.
आज ते कृषी क्षेत्रावर व शेतकऱ्यांवर बोलत असले तरी आमच्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने शेतकºयांना ४० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्याच कर्नाटकातील सरकारने उसाला चांगला दर मिळवून दिला. देशातील जनतेला पंधरा लाख देऊ असे सांगून मोदींनी फसवणूक केली; पण काँग्रेसचे सरकार येताच देशातील ५ कोटी महिलांच्या खात्यावर प्रतिवर्षी ७२ हजार रुपये जमा करणार आहे आणि ही केवळ घोषणा नसून हे सत्यात उतरणार आहे. कारण हा निर्णय आम्ही अभ्यास करून घेतला आहे.
>‘गुरुंना उमेदवारी नाकारणे ही मोदींची संस्कृती’
राहुल गांधी म्हणाले, मोदी हे नेहमी धर्म व संस्कृती याबद्दल बोलत असतात. आपल्या संस्कृतीत गुरुला खूप महत्त्व आहे; पण मोदींनी आपले गुरू लालकृष्ण अडवाणी यांनाच उमेदवारी नाकारून वेगळीच संस्कृती दाखवली आहे.