मुंबई- सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्याने सध्या ते राजकीय अडचणीत सापडले आहेत, एकीकडे विरोधी पक्ष भाजपाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं याबाबत संयमाची भूमिका घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ असं सांगत सावध पवित्रा घेतला आहे.
यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच हवा असं म्हटलं आहे. मात्र किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे ते सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यात महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे यांचा समावेश आहे.
तसेच रविवारी सकाळी ११.३० वाजता दोनदा धमकीचे फोन आले, सर्व ६ बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार, गेल्या २ दिवसांपासून धमकीचे फोन सुरूच आहे. याबाबत मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना किरीट सोमय्या यांनी पत्र लिहून कळवलं आहे. दुर्देवाची बाब म्हणजे अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. फक्त तक्रार नोंद केली आहे अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकरण?
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली. ओशिवरा पोलीस ठाण्यात रेणु शर्मा नावाच्या महिलेने तक्रार अर्ज दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी लोकमतला दिली. तक्रारदार महिला ही मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीची लहान बहीण आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती उघड केली होती. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवतात
मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवतात असा घणाघात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी करत ३ महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण
बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत सोशल मीडियातून जाहीर खुलासा केला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती नमूद केली आहे.