भाजपा आमदारांकडून सभागृहात धमक्या, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:02 PM2021-07-05T17:02:23+5:302021-07-05T17:06:09+5:30
Maharashtra Assembly Session 2021 : भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झाल्याचे पाहायला मिळाले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. त्याआधी अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत, हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत मजल भाजपाची गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने चालवला आहे, हे लोकशाहीला घातक आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
'अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलले आता आत जातायेत'- मुनगंटीवार
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आजच्या कामकाजाच्या पत्रिकेवरच आक्षेप घेतला. त्यानंतर 50ए अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार बोलत असताना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी त्यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार चांगलेच संतापले. "तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? अनिल देशमुख देखील असेच मध्ये मध्ये बोलायचे. आता ते आत जात आहेत. त्यामुळे असे मध्ये मध्ये बोलू नका. मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलतो आहे. तो माझा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये बोलण्याचे काही कारण नाही. सरकारची चमचेगिरी सुरू आहे", असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
'तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल', भाजपा आमदाराचा हल्लाबोल https://t.co/3TRvGQVOYx@BJP4Maharashtra@BJP4India@ShivSena@BhatkhalkarA#MaharashtraAssemblySession2021#Atulbhatkhalkar
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021
12 आमदारांचे निलंबन
दरम्यान, आज विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला आहे. यानंतर ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजपा आमदार आक्रमक झाले. भाजपा आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. भाजपाकडून ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. दरम्यान, ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
निलंबन झालेल्या आमदारांची नावे-
१. संजय कुटे
२. आशिष शेलार
३. गिरीश महाजन
४. पराग अळवणी
५. राम सातपुते
६. अतुल भातखळकर
७. जयकुमार रावल
८. हरीश पिंपळे
९. योगेश सागर
१०. नारायण कुचे
११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया
१२. अभिमन्यू पवार
"उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, मग ओबीसींसाठी का देत नाही?"https://t.co/pDYjijWhLX@BJP4Maharashtra@BJP4India@Dev_Fadnavis@ShivSena@NCPspeaks@ChhaganCBhujbal#OBCreservation
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021