मुंबई: महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या अर्थमंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची धुरा सांभळणाऱ्या मुनगंटीवार यांनी सांगितल्यानुसार, राज्याचे अर्थमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना हवं होतं. मुनगंटीवार यांनी लोकमतला एक विशेष मुलाखत दिली, यात त्यांनी हा खुलासा केला आहे.
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस या कार्यक्रमात माजी अर्थमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली. ही एक अराजकीय मुलाखत असल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणाव्यतिरिक्त त्यांच्या खासगी आयुष्यावरही प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांना मिळालेल्या अर्थमंत्री पदाबाबात एक मोठा खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना सुधीर मुगंटीवार म्हणाले की, '2014 मध्ये भाजपाचं सरकारं आलं. त्यावेळेस मी कधीच अर्थमंत्री होण्याचा विचार केला नव्हता. पण, जेव्हा अर्थमंत्री पदासाठी माझ्या नावाची घोषणा झाली, तेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. मला अर्थमंत्री कशाला करता, इतर कुणाला तरी अर्थमंत्रीपद द्या आणि मला दुसरं कोणता खातं द्या, अशी विनंती मी त्यांना केली होती.'
फडणवीसांना व्हायचं होतं अर्थमंत्री...मुगंटीवार पुढे म्हणाले की, 'अर्थखात्याचा थेट जनतेशी संबंध येत नाही, या खात्याची जबाबदारी असताना जनतेमध्ये जास्त मिसळता येत नाही, त्यामुळे मला इतर कोणतही खातं द्यावं, असं मी फडणवीसांना म्हणालो होतो. पण, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सुधीरभाऊ खरतर मला अर्थमंत्री व्हायचं होतं. पण, अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी यांनीच मला अर्थखात न घेता इतर सहकाऱ्यांना विशेषतः तुम्हाला द्या असं सांगितलं आहे.'
अर्थविभागाशी संबंधित आकडेवारी मुखपाठ अर्थमंत्री पदावर असताना सुधीर मुनगंटीवारांना खात्याशी संबंधित जवळ-जवळ सर्व आकडेवारी मुखपाठ असायची. कुठल्याही भाषणात किंवा सभागृहात बोलताना ते पटापट आकडेवारी सांगायचे. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, ते म्हणाले की, 'मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो. शाळेपासूनच मला अकाउंट आणि गणिताविषयी विशेष आवड होती. अर्थमंत्री झाल्यानंतर मला या खात्याबाबत जास्त माहिती नव्हती. पण, त्यावेळेसचे अर्थ खात्याचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी मला हे खातं समजून घेण्यास खूप मदत केली. त्यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत मी अर्थविभागाशी संबंधित काही आकडेवारी त्यांच्यासमोर मांडली. तेव्हा त्यांनी मला आकडेवारी मुखपाठ असल्याचे पाहून माझे कौतुक केलं. एक जेष्ठ अधिकारी कौतुक करतो, त्यातूनच मला प्रेरणा मिळाली आणि तेव्हापासून मी यासंबंधी महत्वपूर्ण आकडेवारी मुखपाठ करू लागलो,'असं मुनगंटीवार म्हणाले.