पवार कुटुंबानंतर ठाकरे घराणं एकत्र येण्याची हीच ती वेळ; राज-उद्धव साथ-साथ येणार? 

By प्रविण मरगळे | Published: November 27, 2019 08:41 PM2019-11-27T20:41:17+5:302019-11-27T20:42:19+5:30

अजित पवारांनी बंडाचं हत्यार म्यान करुन पक्षाच्या सक्रीय राजकारणात पुन्हा सहभाग घेतला. या संघर्षाच्या काळात शरद पवारांनी मोठी भूमिका बजावली. 

This is the time for the Thackeray family to come together after the Pawar family; Will Raj-Uddhav come along? | पवार कुटुंबानंतर ठाकरे घराणं एकत्र येण्याची हीच ती वेळ; राज-उद्धव साथ-साथ येणार? 

पवार कुटुंबानंतर ठाकरे घराणं एकत्र येण्याची हीच ती वेळ; राज-उद्धव साथ-साथ येणार? 

googlenewsNext

प्रविण मरगळे

मुंबई  - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी विचारधारा असणाऱ्या पक्षांशी आघाडी केली. उद्या शिवाजी पार्क येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती शपथ घेणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहे. पण त्याचसोबत सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं ठाकरे कुटुंब या सोहळ्याचं निमित्ताने एकत्र येणार आहे. ते दृश्य टिपण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. 

राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय संघर्षात पहिल्यांदाच शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी बंड पुकारुन थेट भाजपाशी हातमिळवणी केली. अजित पवारांनी केलेलं हे बंड पक्षासोबत पवार कुटुंबाच्याही जिव्हारी लागलेलं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांशी मनधरणी करण्याचे प्रयत्न केले पण त्यात यश आलं नाही, शेवटी पवार कुटुंबातील सदस्यांनी अजित पवारांसोबत चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करण्यात आली. अजित पवारांनी बंडाचं हत्यार म्यान करुन पक्षाच्या सक्रीय राजकारणात पुन्हा सहभाग घेतला. या संघर्षाच्या काळात शरद पवारांनी मोठी भूमिका बजावली. 

Image result for ajit pawar and sharad pawar

पवार कुटुंब एकत्र आल्याने कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अजित पवारांना पुढील काळात काय मिळणार हे शरद पवारच ठरवतील. पण राजकीय सत्तासंघर्षामुळे दुरावलेली नाती एकत्र आणण्यासाठी कुटुंबाने केलेल्या प्रयत्नाला यश आलं. पवार कुटुंबासोबत महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात ठाकरे घराण्याचं नावंही घेतलं जातं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी पक्षाशी फारकत घेत मनसे हा स्वतंत्र पक्ष निर्माण केला. उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय मतभेद निर्माण झाल्याने शिवसेनेत फूट पडली. आज या घटनेला 12 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या दरम्यानच्या काळात जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणून हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले दिसलं आहे. 

Image result for thackeray family raj uddhav
Image result for thackeray family raj uddhav

अलीकडच्या काळात राज ठाकरे यांच्या मुलाचं लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते. तर उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावेळी राज ठाकरेंनी भक्कम साथ दिली. यंदाच्या निवडणुकीतही ठाकरे घराण्यातील ऋणानुबंध पुन्हा झळकून आले. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. उद्धव ठाकरेंचा मुलगा आणि राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. या मतदारसंघात राज ठाकरेंच्या मनसेने उमेदवार दिला नाही. माझ्या घरातील मुलगा निवडणुकीला उभा आहे त्यामुळे मी उमेदवार दिला नाही असं राज ठाकरेंनी जाहीर सांगितलं. तर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या विजयानंतर राज यांचे अप्रत्यक्षरित्या आभार मानले. 

Image result for raj uddhav pawar

सध्या राज ठाकरे यांच्या मनसेचा एकमेव आमदार यंदाच्या निवडणुकीत निवडून आला आहे. पण मागील वेळीपेक्षा मनसेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात राज ठाकरेंनी आक्रमकरित्या प्रचार केला. लोकसभा निवडणुकीतही राज यांनी मनसेचा उमेदवार उभा न करता मोदी-शहा यांच्याविरोधात जाहीर सभा घेतल्या.

Image result for balasaheb raj uddhav

महाराष्ट्रातील बदलेलं राजकारण शिवसेनेने मोदी-शहा यांच्याविरोधात घेतलेली भूमिका त्यामुळे राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांचं या मुद्द्यावर एकमत झाल्याचं सध्यातरी दिसतंय. त्यात ठाकरे घराण्यासाठी ऐतिहासिक क्षण राज्यात असताना राज ठाकरे-उद्धव ठाकरे साथ-साथ येणार का? हे आगामी काळात दिसेल. पण या दोघांना एकत्र आणण्याचा दुवा म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे. पवार-ठाकरे घराण्याचा संबंध सर्वांनाच ठाऊक आहेत. एका मुलाखतीत शरद पवारांनी राज की उद्धव असा प्रश्न विचारताच ठाकरे कुटुंब असं उत्तर त्यांनी दिलं. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्याची ताकद फक्त एका नेत्यात आहे ती म्हणजे शरद पवार. त्यामुळे राजकारणातील सत्तासंघर्षात राज-उद्धव यांनी एकत्र येण्याची हीच ती वेळ असं म्हणायला काही हरकत नाही. 
 

Web Title: This is the time for the Thackeray family to come together after the Pawar family; Will Raj-Uddhav come along?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.