डेहराडून : तीरथ सिंह रावत (tirath singh rawat) यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता क्लायमेक्स आला आहे. राज्याला पुन्हा एकदा नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. या संदर्भात भाजपाने दुपारी तीन वाजता विधिमंडळ पक्षाची महत्वाची बैठक बोलाविली आहे. उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांसंदर्भात या बैठकीत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दुपारी तीन वाजता बैठकमुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी तीन वाजता देहरादूनमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. ही बैठक पार्टीच्या मुख्यालयात होणार आहे. उत्तराखंडचे भाजपा अध्यक्ष मदन कौशिक हे या बैठकीचे नेतृत्व करणार असल्याचे भाजपाचे मीडिया प्रभारी मनवीरसिंग चौहान यांनी सांगितले. सर्व आमदारांना बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. देहरादूनमध्ये राज्यातील सर्व भाजपा आमदारांनी उपस्थित रहावे, असे भाजपाने निर्देश दिले आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक बनविण्यात आले आहे.
आता कोण होणार नवीन मुख्यमंत्री?मार्चमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री झालेले तीरथ सिंह रावत यांचा कार्यकाळ फक्त चार महिने राहिला. आता राज्य पुन्हा आपल्या नव्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहे. सध्या दोन-तीन नावे आहेत, जी पुढील मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहेत. राजपूत किंवा सिंह जातीमधूनच पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत सतपाल सिंह आणि धनसिंह रावत यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी या दोघांची नावे पुढे येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्या नावांबाबत चर्चा झाल्या आहेत, पण त्या वेळी पक्ष हाय कमांडने इतरांना संधी देणे योग्य मानले होते.
तीरथ सिंह रावत यांचा राजीनामादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्या संबंधित बातम्या येत होत्या. उत्तराखंडमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी संध्याकाळी तीरथ सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. आता सर्वांचे लक्ष दुपारी तीन वाजता होणाऱ्या भाजपाच्या विधिमंडळ बैठकीकडे आहे.
दोन जागा रिक्तउत्तराखंडमध्ये विधानसभेच्या दोन जागा गंगोत्री आणि हल्द्वानी रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्याने सदस्यत्वाचा एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल.