राज्यातील १० जागांसह देशात ९५ मतदारसंघांत आज मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:03 AM2019-04-18T07:03:39+5:302019-04-18T07:04:05+5:30
महाराष्ट्रातील १0 लोकसभा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावतील.
नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रातील १0 लोकसभा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावतील. या ९६ मतदारसंघांत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, फारुख अब्दुल्ला, खा. हेमा मालिनी, खा. कणिमोळी, राज बब्बर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, कार्ती चिदम्बरम, तारीक अन्वर यांच्यासह १६०० उमेदवार रिंगणात आहेत.
महाराष्ट्रासह १२ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होणार असून, तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. महाराष्टÑातील अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर बुलडाणा या १0 मतदारसंघांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय तामिळनाडू (३८), कर्नाटक (१४), बिहार, ओडिशा व आसाम (प्रत्येकी ५), उत्तर प्रदेश (८),पश्चिम बंगाल व छत्तीसगढ ( प्रत्येकी ३), जम्मू-काश्मीर (२) तर मणिपूर,त्रिपुरा (प्रत्येकी एक) या राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरी ( प्रत्येकी १) मध्येही मतदान होईल.
तामिळनाडूतील वेल्लोरची निवडणूक रद्द झाली असून, त्रिपुरा (पूर्व) मध्ये आता गुरुवारऐवजी २३ एप्रिल रोजी मतदान होईल.
या टप्प्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्युअल ओराम, सदानंद गौडा आणि पी.राधाकृष्णन्, कॉँग्रेसचे वीरप्पा मोईली, द्रमुकचे दयानिधी मारन, ए. राजा, शिवसेनेचे आनंदराव अडसुळ, भाजपच्या प्रीतम मुंडे, काँग्रेसप्रणित आघाडीतील युवा स्वाभिमानीच्या नवनीत राणा यांचे भवितव्यही ठरणार आहे.
ओडिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही गुरुवारीच मतदान होत असून, त्यात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजेपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. ते दोन मतदारसंघांतून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.
१९ केंद्रांवर फेरमतदान
अतिरेक्यांनी मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रांची तोडफोड केल्याच्या तक्रारी आल्याने निवडणूक आयोगाने बाह्य मणिपूर मतदारसंघातील १९ मतदान केंद्रांवरही गुरुवारी फेरमतदान घेण्याचे ठरविले आहे.
>तामिळनाडूच्या ३८ जागांचे एकाच टप्प्यात मतदान
तामिळनाडूसह पुद्दुचेरी, त्रिपुरा आणि मणिपूर या
चार राज्यांतील मतदान या टप्प्यानंतर पूर्ण होईल.
तामिळनाडूच्या ३९ पैकी ३८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत असल्याचे आढळल्याने निवडणूक आयोगाने वेल्लुरची रद्द केली आहे. सध्या ३९ जागांपैकी ३७ जागांवर अण्णा द्रमुकचे खासदार आहेत. भाजप व पीएमकेचा प्रत्येकी एका ठिकाणी खासदार आहे.
>दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांपैकी कोणाचे किती खासदार होते?
रालोआ : 33 । भाजप : २७, शिवसेना : ४, आॅल इंडिया एनआर काँग्रेस : १, पीएमके : १
संपुआ : 15 । कॉँग्रेस : १२, राजद : २, राष्टÑवादी : १
इतर : 49 । अण्णाद्रमुक : ३५, बिजद : ४, माकपा : ४, जेडीएस : २, पीडीपी : १, जेडीयू : १, तृणमूल : १, एआययूडीएफ : १
>सध्या कुठे आहे कुणाचा खासदार
भाजपा : अकोला, बीड, सोलापूर, लातूर
शिवसेना : बुलडाणा, अमरावती, परभणी, उस्मानाबाद
कॉँग्रेस : नांदेड, हिंगोली
>12
राज्यांत लढाई
राज्य जागा
तामिळनाडू : ३८
कर्नाटक : १४
महाराष्टÑ : १०
बिहार : ५
आसाम : ५
ओडिशा : ५
उत्तर प्र्रदेश : ८
पश्चिम बंगाल : ३
छत्तीसगड : ३
जम्मू-काश्मीर : २
मणिपूर : १
पुद्दुच्चेरी : १
एकूण : ९५
>या मंत्र्यांचेभवितव्य आज होणार यंत्रबंद
>केंद्रीय सांखिकी मंत्री सदानंद गौडा हे बंगळुरू उत्तरमधून पुन्हा निवडणूक लढवित आहेत. यावेळी त्यांना कॉँग्रेस-जेडीएस युतीचे कृष्णा बायरे गौडा यांचे आव्हान आहे. सदानंद गौडा यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा मुख्य आक्षेप आहे.
केंद्रीय आदिवासी विकासमंत्री ज्युअल ओराम ओरिसातील सुंदरगडमधून पुन्हा नशीब अजमावत आहेत. विरोधात सुनिता बिस्वाल (बिजद) आणि जॉर्ज तिर्की (कॉँग्रेस) आहेत.
>केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसने पुन्हा एच.वसंतकुमार यांनाच उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघामध्ये नाडर मतदारांचे वर्चस्व आहे.
>देवेगौडा, फारुख अब्दुल्ला, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, हेमामालिनी, प्रकाश आंबेडकर, सदानंद गौडा, पी. राधाकृष्णन, वीरप्पा मोईली, आनंदराव अडसूळ या दिग्गजांचा होणार फैसला