- शीलेश शर्मानवी दिल्ली : टूलकिटवरून केंद्र सरकार, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. काँग्रेसने असा आरोप केला आहे की, भाजप सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली पोलिसांकडून ट्विटरच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, सत्याला कुणाची भीती नाही. पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी भाजपचे मंत्री पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, स्मृती इराणी यांच्या नावांचा उल्लेख करून ट्विटरला एक पत्र लिहिले आहे. ज्या प्रकारे संबित पात्रा यांच्या ट्वीटला मॅनिप्युलेटेड मीडिया टॅग केले आहे, त्याप्रमाणेच या मंत्र्यांच्या ट्वीटलाही त्याच श्रेणीत टाकावे, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकार ट्विटरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे की, संबित पात्रा यांच्या ट्वीटमधून मॅनिप्युलेटेड मीडिया शब्द हटवावा. दिल्ली पोलिसांनी सोमवारी ट्विटरच्या दिल्ली आणि गुरुग्राम येथील कर्यालयांवर धाड टाकत चौकशी केली. तरीही पोलिसांचा असा दावा आहे की, केवळ नोटीस देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे माजी खासदार राजीव गौडा आणि सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांना नोटीस देऊन विचारले आहे की, त्यांनी हे सिद्ध करावे की, भाजपकडून हेराफेरी करण्यात आली आहे.
ट्विटर भूमिकेवर ठाम : ट्विटरनेही केंद्र सरकारविरुद्ध आपली कठोर भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी मॅनिप्युलेटेड मीडिया टॅग करण्याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, ट्विटरला त्याचे उत्तर देणे बंधनकारक नाही आणि आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.