मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असल्याने ममता बॅनर्जींची(Mamata Banerjee) भेट होऊ शकली नाही. परंतु शिवसेनेचे नेते मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली.
शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जात भेट घेतली. या भेटीत ममता-पवार यांनी २०२४ च्या निवडणुकांबाबत चर्चा केली. या चर्चेत राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधात सक्षम पर्याय देण्याबाबत संवाद झाला. त्यासाठी भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे या भेटीत ममता यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेतृत्वावर टीका केली. त्याला पवारांनीही समर्थन दिले.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धूळ चारली. अगदी पंतप्रधानांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र त्याठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता राष्ट्रीय स्तरावर मोर्चा उघडला आहे. गोवा, त्रिपुरा, मेघालय यासारख्या राज्यात ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने शिरकाव केला आहे. या राज्यातील प्रमुख नेते टीएमसीत प्रवेश करत असल्याने ममता बॅनर्जींच्या राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने जोरदार पाऊल टाकण्याचे संकेत मिळत आहेत.
त्यातच ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्याने महाराष्ट्रातही तृणमूल काँग्रेसचा शिरकाव होणार का? असा प्रश्न सगळीकडून विचारला जात होता. त्यावर ममता बॅनर्जींनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात मी येत नाही असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामागे कारण दिलंय की, जिथं जिथं प्रादेशिक पक्ष चांगले काम करत आहेत तिथं टीएमसी जाणार नाही. ज्याठिकाणी भाजपाविरोधात ताकदीची गरज आहे तिथे आम्ही त्या ताकदीसोबत उभं राहणार आहोत. प्रादेशिक पक्षांना साथ देणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.
शरद पवारांनी केले ममता बॅनर्जींचे स्वागत
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र जुने नाते आहे. भाजपविरोधात जे एकत्र येतील त्या पक्षांचे स्वागत असेल. भाजपाविरोधात देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्तरावर एकसारखा विचार करणाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४ च्या निवडणुकीत हा पर्याय उपलब्ध हवा. त्यासाठीच आमची भेट झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.