कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) जसजशी जवळ येत आहे. तसतसे राज्यात हिंसक राजकारण वाढू लागले आहे. आतातर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांच्या सरकारमधील मंत्र्यावरच बॉम्बहल्ला (Bomb Attack) झाल्याने खळबळ उडाली आहे. तर कोलकात्यामध्ये भाजपा (BJP) आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. (Bomb attacked on Trinamool Congress minister Zakir Hussain in West Bengal)ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यात पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यानंतर हुसेन यांना तातडीने जंगीपूरमधील उपविभागीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मंत्री झाकीर हुसेन यांचा ताफा निमिता रेल्वेस्टेशनच्या दिशेने जात असताना ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला.मिळत असलेल्या माहितीनुसार मंत्री झाकीर हुसेन यांना आता कोलकातामध्ये आणण्यात येत आहे. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील डॉक्टर एके बेरा यांनी सांगितले की, सध्या मंत्री झाकीर हुसेन यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेले मंत्री दिसत आहेत. तसेच या घटनेनंतर मंत्र्यांना कशाप्रकारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हे दिसत आहे.एकीकडे मंत्र्यांवर बॉम्बहल्ला झाला तर दुसरीकडे कोलकातामध्ये भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे वृत्त आहे. भाजपाचे नेते फूलबागान परिसरात उपायुक्तांच्या कार्यालयात एका घटनेबाबतची माहिती घेण्यासाठी जात होते. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यादरम्यान बाचाबाची होऊन दोन गट एकमेकांशी भिडले.दरम्यान, पश्चिम बंगालमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी निषेध केला आहे. याबबत केलेल्या ट्विटमध्ये विजयवर्गीय म्हणाले की, झाकीर हुसेन यांच्यावर निमटिटा रेल्वेस्टेशनवर क्रूड बॉम्बच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी मी प्रार्थना करतो.
बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी रक्तपात, मंत्र्यावर बॉम्बहल्ला, तर कोलकात्यात BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
By बाळकृष्ण परब | Published: February 18, 2021 8:10 AM