आगरताळा - पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरामध्येबिप्लब देव यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार अडचणीत आले आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाचे आमदार आपल्याच मुख्यमंत्र्याविरोधात आघाडी उघडली असून, हे आमदार मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षांचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जुन्या नेत्यांच्या मागण्या आणि तक्रारींकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत, तसेच या नेत्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री बिप्लब देव हे उदासिन असल्याचा या आमदारांचा आरोप आहे.मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराज असलेले काही आमदार आगरताळा येथून दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच आपल्यासोबत न्याय व्हावा आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला लगाम घालण्यात यावा अशी या आमदारांची मागणी आहे. हे आमदार याविषयावरून पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्याच्या घडीला एकूण ११ आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच या आमदारांन बिप्लब देव यांच्या कॅबिनेटमधील काही मंत्र्यांचा पाठिंबादेखील आहे.त्रिपुरामधील सूर्यमणिनगर मतदारसंघातील आमदार रामप्रसाद पाल यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.या चर्चेदरम्यान, त्यांनी आमदारांनी केलेल्या तक्रारी मांडत मुख्यमंत्र्यांच्या मनमानी कारभाराची माहितीही त्यांना दिला. दरम्यान, आपल्याला भाजपापासून कुठलीही अडचण नसून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबाबत निष्ठावान आहोत, असे या आमदारांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आपल्याला एकूण २५ आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे ते उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात येऊ इच्छिच नाहीत. मात्र राज्यातील नेतृत्वावरून त्यांच्या विश्वास सातत्याने कमी होत चालला आहे, असा दावाही रामप्रसाद पाल यांनी केला. सध्या दिल्लीत तळ ठोकून असलेल्या आमदारांमध्ये सुशांत चौधरी, परिमल देववर्मा, आरसी रंखवाल, आशिष दास, अतुल देववर्मा, बर्बमोहन त्रिपुरा आणि रामप्रसाद पाल यांचा समावेश आहे. तर तेलियामुरा येथील आमदार कल्याणी राय यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. कल्याणी राय हया त्रिपुरामधील दोन महिला खासदारांपैकी एक आहेत.त्रिपुरामधील बिप्लब देव सरकारला एकूण ४४ आमदारांचा पाठिंबा आहे. पैकी ८ आमदार हे आयपीएफटी पक्षाचे आहेत. दरम्यान, आयपीएफटीच्या आमदारांचासुद्धा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा रामप्रसाद पाल यांनी केला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वाचा वरदहस्त असल्याचे मानले जाते. मात्र त्यांच्याविरोधातील वाढत्या तक्रारी त्यांच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या आहेत. त्यातच नाराज आमदारांनी आता पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे देव यांच्या अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
त्रिपुरामध्ये भाजपा सरकार अडचणीत, आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात उघडली आघाडी
By बाळकृष्ण परब | Published: October 11, 2020 1:39 PM
Tripura BJP Government News : मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराज असलेले काही आमदार आगरताळा येथून दिल्लीत दाखल झाले आहेत.
ठळक मुद्देभाजपा आमदार मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार घेऊन दिल्लीत दाखल राज्यात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षांचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जुन्या नेत्यांच्या मागण्या आणि तक्रारींकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीतया नेत्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री बिप्लब देव हे उदासिन असल्याचा या आमदारांचा आरोप