झारखंड सरकार पाडण्याचा कट प्रकरणी महाराष्ट्रातील माजी मंत्र्यासह 'या' ६ भाजपा नेत्यांना नोटीस?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:15 AM2021-07-30T06:15:15+5:302021-07-30T06:16:37+5:30
रांची पोलीस या सहा लोकांचे बयाण नोंदविणार असून, रांची पोलिसांचे पथक मुंबईत तळ ठोकून आहे.
एस. पी. सिन्हा
रांची : झारखंडमधील आमदारांची खरेदी आणि सरकार पाडण्याच्या कटप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, चरणसिंग ठाकूर यांच्यासह सहा जणांना एक-दाेन दिवसांत नोटीस पाठविण्याची तयारी रांचीच्या पोलिसांनी केली आहे.
बावणकुळे, ठाकूर यांच्यासह हाॅटेल लीलेकमध्ये वास्तव्याला राहिलेले जयकुमार बेलखेडे, मोहित भारतीय, आशुतोष ठक्कर, अमितकुमार यादव यांना रजिस्टर्ड नोटीस पाठविली जाणार आहे. निर्धारित वेळेत नोटीसला उत्तर न मिळाल्यास या सर्वांना प्रतिवादी बनविले जाईल. या संपूर्ण प्रकरणात काॅंग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी दारूमाफियांवर बदनामीचा आरोप करून लक्ष वेधले आहे. रांची पोलीस या सहा लोकांचे बयाण नोंदविणार असून, रांची पोलिसांचे पथक मुंबईत तळ ठोकून आहे. चंद्रशेखर बावणकुळे, ठाकूर यांच्यासह एनएसजीचे माजी सहायक कमांडर जयकुमार बेलखेडे, भाजपचे नेते मोहित भारतीय, आशुतोष ठक्कर, अनिल जाधव यांची पोलीस चौकशी करणार आहेत. याप्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत.
सत्य आठवड्यात उघड होणार
आमदारांना निर्दोष ठरविण्याबाबत कोणत्याही तथ्याकडे डोळेझाक केली जाणार नाही. आम्ही सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. काॅंग्रेसचे आमदार निर्दोष असल्याचे प्रारंभीच्या तपासात आम्हाला आढळून आले आहे. सखोल तपासानंतर एक आठवड्यात सत्य समोर येईल, असे झारखंडचे वित्त तसेच अन्नपुरवठामंत्री डाॅ. रामेश्वर उरांव यांनी म्हटले आहे.