- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. नजीकच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा अखेरच्या टप्प्यात पार पडणार आहेत. हे सर्व दिग्गज नेते एकमेकांवर कोणते आरोप-प्रत्यारोप करतात, कोणती आश्वासने देतात. याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात खऱ्या अर्थाने प्रचार तोफांना त्यांच्याकडूनच बत्ती दिली जाणार असल्याने त्यांच्या प्रचारसभा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचे बोलले जाते.गीते आणि तटकरे दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेचे केली आहे. दोघांच्या सभांना गर्दी होताना दिसत आहे. गीते यांची ओळखही सदाचारी नेता अशी आहे, तसेच मी कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही, असे ते आवर्जून सांगतात. मात्र, अलीकडेच त्यांच्या प्रचाराचा आणि एकूणच भाषणाचा रोख हा बदलल्याचे दिसून येते.गीते यांनी गेल्या ३० वर्षांत आणि मंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कालावधीत नक्की कोणता विकास केला, असा प्रश्न तटकरे त्यांना जाहीर सभांमधून करत आहेत. गीतेंनी विकासच केलेला नाही, त्यामुळेच त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखे काहीच शिल्लक नसल्याने टीका करत असल्याचे प्रतिउत्तर तटकरे हे देत आहेत.
दिग्गजांच्या प्रचारसभा ठरणार टर्निंग पॉइंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 23:55 IST