अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला, ते ट्विट ठाकरे यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या खाजगी व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या सगळ्या प्रकारात माहिती खात्याच्या वाट्याला नाहक बदनामी आल्याने विभागातले अधिकारी अस्वस्थ आहेत.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्या फोटोसह मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली. त्यावेळी संभाजीनगर आणि कंसात औरंगाबाद असे लिहिले गेले. त्यावर महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे,’ असा सल्लादेखील थोरात यांनी दिला होता. मात्र असे ट्विट करण्याआधी महसूल मंत्र्यांनी माहिती मागितली असती तर त्यांना वस्तुस्थिती कळली असती. त्या माहितीच्या आधारे ते थेट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकले असते. एका खासगी व्यक्तीमुळे निष्कारण संपूर्ण विभागाची बदनामी टाळता आली असती, अशी भावना विभागातील अनेक अधिकारी बोलून दाखवत आहेत. सदर व्यक्ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून त्यांचा सोशल मीडिया सांभाळत आली आहे. कोणतेही ट्विट करण्याआधी ही व्यक्ती मुख्यमंत्र्यांना ट्विट दाखवून त्यांच्याकडून ओके मिळाल्यानंतरच ते ट्विट प्रकाशित करत आली आहे. किमान समान कार्यक्रम हा वेगळा भाग आहे, आणि शिवसेना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करते हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. त्यामुळे शिवसेनेशी संबंधित नेते संभाजीनगरच म्हणतील त्यात त्या नेत्यांना गैर वाटत नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळापासून खासगी व्यक्तींना मंत्र्यांचे प्रसिद्धिप्रमुख नेमण्याची पद्धत सुरू झाली. प्रत्येक मंत्र्याकडे एक तरी खासगी प्रसिद्धिप्रमुख आहे. माहिती खात्याच्या वतीने माहिती अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे काम विभागून दिले जाते. त्यांना कोणती माहिती कशा पद्धतीने व किती द्यायची याची माहिती असते. तयार केलेली बातमी अनेक अधिकारी विभागाच्या सचिवांना दाखवून त्यांच्याकडून तपासून घेतात.
त्यामुळे माहिती खात्याच्या बातम्यांमध्ये फारशा चुका होत नाहीत, पण खासगी प्रतिनिधी अनेकदा परस्पर बातम्या तयार करून माध्यमांना पाठवतात. त्यातून अनेकदा विभाग किंवा सरकार अडचणीत येते. ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा किंवा शाहू महाराजांना कार्यकर्ता संबोधणे ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. यासाठी निश्चित अशी कार्यपद्धती तयार केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.