नवी दिल्ली : आयटी नियमांसंदर्भात केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter) यांच्यातील वाद थांबताना दिसत आहे. केंद्राने कारवाईचा इशारा देताच ट्विटरने आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसह (Mohan Bhagwat) अन्य नेत्यांचे ब्यू टीक परत केले आहेत. (Twitter gives back RSS Chief Mohan Bhagwat's 'blue Tick' Amid IT Rules Row With Centre.)
केंद्र सरकारकडून आज (शनिवार) ट्विटरला अखेरची नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत ट्विटरला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. ट्विटरने नियम मान्य करावेत अथवा भारतीय कायद्यानुसार, परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे.
खरे तर, 25 फेब्रुवारीला तयार करण्यात आलेल्या आयटी नियमांमध्ये सरकारने स्पष्ट केले होते, की ज्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स असतील, त्यांना भारतात तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल. यासाठी तीन महिन्यांचा कालावधीही देण्यात आला होता. 25 मेरोजी ही मुदत संपली आहे. गेल्या आठवड्यात ट्विटरकडून दिल्ली उच्च न्यायालयात, 28 मेरोजी तक्रार अधिकाऱ्याची नुयुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, यावर सरकार समाधानी नाही.
ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढली होती. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. दोन तासांनतर ट्विटरने आपली चूक सुधारली आणि नायडूंचे पर्सनल अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आले आहे. त्यामुळे ब्लू टिक पुन्हा दिसू लागली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली होती. सहा महिने अधिक कालावधीपासून अकाऊंटमध्ये लॉगइन केले नाही, तर ब्ल्यू टिक हटवण्याविषयीच्या धोरणाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात होते.