मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसल्यानंतर आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आव्हान निर्माण करत आहेत, यातच आगामी महापालिका निवडणुका भाजपा-शिवसेना यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे, यासाठी भाजपाच्या वारंवार बैठका, आंदोलन आणि सत्ताधारी शिवसेनेवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.
एकीकडे भाजपा शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी एकही संधी सोडत नाही तर दुसरीकडे शिवसेनेनेही भाजपाला धडा शिकवण्यासाठी नाशिक महापालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे, नाशिक महापालिकेत सध्या भाजपाचा झेंडा फडकत आहे, याठिकाणी विधानसभा निवडणुकीत बऱ्याच प्रमाणात पक्षांतर पाहायला मिळालं, त्याचा दुसरा भाग आता पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्याआधी पाहायला मिळत आहे, कोणत्याही परिस्थितीत नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवायचा असा निर्धार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी केली आहे. तर सानप यांच्या प्रवेशाने नाराज झालेले भाजपाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकात सुरू होती, माहितीनुसार, नाशिकमधील माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या बंगल्यावर भेट घेतली, यावेळी शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, युवासेनेचे वरूण सरदेसाईही उपस्थित होते, असं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे.
बाळासाहेब सानप यांना विधानसभेचे तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आणि पुन्हा परत भाजपात सामील झाले. राज्यातील अनेक स्थानिक नेते आगामी काळात शिवसेना-राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगू लागली आहे.
दरम्यान, भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी या दोन्ही नेत्यांच्या अन्य पक्षात जाण्याचा इरादा असल्याचा इन्कार केला आहे. गीते आणि बागुल हे दोघेही हाडाचे शिवसैनिक असले तरी सध्या दोघेही भाजपात आहेत. यात त्यांच्या दोघांच्या कुटुंबीयांना अनुक्रमे उपमहापौरपद मिळाले असले तरी त्यांना स्वत:ला अपेक्षित पदे मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गीते उमेदवारी करणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र, त्यानंतरही हा विषय मागे पडला. परंतु तेव्हापासून गीते हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सुनील बागुल यांच्या बाबतीत देखील अशाच प्रकारे चर्चा सुरू आहे. उभयतांनी आपल्याला अन्य पक्षाच्या ऑफर्स असल्याचे सांगून योग्य तो निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने भाजपात ते फार समाधानी नाहीत अशाच चर्चांना पुष्टी मिळत गेली.