एकाच दगडात दोन पक्षी....लोकसभेच्या तिकीट मागणीतून विधानसभेवर दावेदारी.....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 08:04 PM2019-02-16T20:04:26+5:302019-02-16T20:05:44+5:30
लोकसभेसाठी आपले नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसे केले तर विधानसभेची उमेदवारी प्रबळ होईल अशा आशेने या गोष्टी सुरू आहेत.
पुणे: पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागून विधानसभेचा दावा पक्का करण्याचे काम राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. सर्वच पक्षांचे नगरसेवक तसेच संघटनेत प्रमुख जबाबदारी असलेले पदाधिकारीही यात सहभागी आहेत. लोकसभेसाठी आपले नाव चर्चेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तसे केले तर विधानसभेची उमेदवारी प्रबळ होईल अशा आशेने या गोष्टी सुरू आहेत.
सर्वाधिक मागणी भारतीय जनता पार्टीकडे आहे. सध्या विधानसभेचे शहरातील आठही मतदारसंघ याच पक्षाकडे असून महापालिकेतही त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळेच बहुसंख्य नगरसेवकांना विधानसभेची स्वप्ने पडत आहेत. मात्रउमेदवारीसाठी विद्यमान आमदारांचा पहिला विचार होईल याची खात्री असल्यानेच थेट लोकसभेसाठीच नाव चर्चेत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पक्ष संघटनेचे पदाधिकारीही यात मागे नाहीत.
भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचेही नाव लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात आहे. त्यामागेही त्यांना विधानसभेची उमेदवारी हवी असलेल्याचे बोलले जात आहे. हडपसर परिसरात गोगावले यांचे बरेच नातेवाईक आहेत. तिथे सध्या योगेश टिळेकर हे आमदार आहेत. भाजपाने केलेल्या विधानसभा सर्वेक्षणात ते डेंजर झोन मध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच गोगावले समर्थकांचा त्या मतदारसंघावर डोळा आहे. थेट गोगावले काही बोलत नसले तरीही त्यांचे समर्थक कार्यकर्ते मात्र दादा विधानसभेचे उमेदवार असतील असे खात्रीने सांगत आहेत. जोरात मागणी केली तर विधानसभा नाही तर मग विधानपरिषद तरी पदरात पडेल अशी त्यांची अपेक्षा आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्याच आमदार मेधा कुलकर्णी तिथे चांगले वर्चस्व ठेवून आहेत. मात्र स्थायी समितीचे अध्यक्षपदी कार्यरत राहिलेले नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना तिथून उमेदवारी हवी आहे. ती थेट मागता येत नसल्यामुळे त्यांनीही लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आपलेही नाव दाखल केले आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जगदीश् मुळीक आमदार आहेत. त्यांचे बंधू योगेश मुळीक पालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. जगदीश यांच्याऐवजी योगेश यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी असा एक प्रवाह त्या भागात आहे. त्यामुळेच योगेश यांचेही नाव लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपाच्याच माधूरी मिसाळ आमदार आहेत. तिथून पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना उमेदवारी हवी आहे. त्यांनी लोकसभेचे थेट नाव घेतले नसले तरी पर्वती मधून विधानसभा लढवण्याची इच्छा मात्र लपवलेली नाही. त्यांचे कार्यकर्ते तर आतापासूनच तयारीलाही लागले असल्याचे बोलले जात आहे. जुने बाजूला गेल्याशिवाय नव्यांना संधी मिळणार कशी असा त्यांचा सवाल आहे. कसबा मतदार संघात पालकमंत्री गिरीश बापट यांची पाचवी टर्म आहे. या मतदारसंघातून खुद्द महापौर मुक्ता टिळक इच्छुक आहेत. बापट यांना लोकसभेची उमेदवारीही हवी आहे व कसब्यावरील आपले वर्चस्वही कायम ठेवायचे आहे.
काँग्रेसमध्येही हाच प्रकार सुरू आहे. प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी लोकसभेसाठी आपली नावे इच्छुकांच्या स्पर्धेत आणली आहेत. शिंदे यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी हवी आहे. छाजेड यांनाही पर्वती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लढायचे आहे. त्यामुळेच नाही लोकसभेची उमेदवारी मिळाली तरी चालेल, पण त्यातून विधानसभेसाठी नाव तरी पक्के करता येईल अशा विचाराने त्यांची राजकीय पावले पडत आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनीही लोकसभेसाठी थेट दिल्लीतून प्रयत्न चालवले आहेत. माजी आमदार मोहन जोशी यांच्या तर दिल्ली, मुंबईच्या रोज फेऱ्या सुरू आहेत. लोकसभेसाठी उमेदवारी मागितली व मिळाली नाही तरी विधानसभा किंवा विधान परिषद कुठे गेली नाही असा त्यांचा होरा आहे.