राष्ट्रवादीत पडले उघड दोन गट; बहुतांश नेते शरद पवारांसोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 06:20 AM2020-08-15T06:20:48+5:302020-08-15T06:45:48+5:30
बारामतीत आज पवार कुटुंबीयांची बैठक; परिवारात गोडवा टिकवण्याचा प्रयत्न
- अतुल कुलकर्णी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड-उघड दोन गट पडले असून बहुतांश नेते शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी शनिवारी बारामती येथे कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील गोडवा कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, छगन भुजबळ असे नेते शरद पवारांच्या स्पष्टपणे बाजूने आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पार्थ यांच्याविषयी आणि ते करत असलेल्या कृत्याविषयी काही गोष्टी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याशिवाय काही नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी पार्थ पवार हे बाहेर तुमच्याबद्दल काय बोलतात, हे शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे समजते.
पक्षात पार्थविषयी का आहे नाराजी?
मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर काही नेत्यांनी पार्थला मतदार- संघातील लोकांच्या संपर्कात राहा, असा सल्ला दिला होता. मात्र पार्थ तिकडे फिरकलाच नाही. अजित पवार यांचे सोशल मीडिया पार्थच हाताळत होता. पक्षातल्या काही नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणे असे प्रकारही पार्थच्या सांगण्यावरून घडले. नेत्यांच्या बाबतीत पार्थचा होणारा हस्तक्षेपदेखील शरद पवार यांच्या नाराजीचे कारण ठरला, असेही सूत्रांनी सांगितले.
आजोबांनी घेतली नातवाची ‘शाळा’!
गुरुवारी रात्री उशिरा पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, आपल्याला तीच भूमिका घ्यावी लागेल, माझ्या कुटुंबातील व्यक्तीनेच त्याला छेद देणारी भूमिका घेणे पक्षहिताचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी पार्थची ‘शाळा’ घेतल्याचे समजते.
हा तर पवार कुटुंबातील प्रश्न
हा पूर्णपणे पवार कुटुंबातला प्रश्न आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणाशी विसंगत भूमिका जर कोणी मांडत असेल, त्यामुळे संभ्रम निर्माण होत असतील, तर वडीलधाऱ्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. शरद पवार हे कुटुंबाचेच नव्हे, तर राष्ट्रवादी कुटुंबाचे प्रमुख आहेत. ते जर काही बोलले असतील तर त्यात परिवाराचा विषय म्हणून बघितले पाहिजे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष
सुप्रिया सुळे यांच्या भेटीगाठी वाढल्या
पार्थवरून सुरू झालेल्या ‘महाभारता’चे पर्यवसान कौटुंबिक आणि पक्षीय कलहात होऊ नये यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.