अहमदाबाद – गुजरातकाँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमधील मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. भावनगर येथील काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान महिला अध्यक्षा यांच्या बुधवारी हमरीतुमरी झाली. बुधवारी काँग्रेसनं एका रॅलीचं आयोजन केले होते. रॅलीवेळी दोन महिला नेत्या एकमेकांना भिडल्या. या नेत्यांच्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
भावनगर शहर काँग्रेसद्वारे कंसारा मुद्द्यावरुन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दोन महिला नेत्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघी नेत्या रॅलीमध्येच एकमेकींना भिडल्या. काँग्रेसच्या माजी महापौर आणि माजी महिला अध्यक्षा यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांनी दोन्ही महिला नेत्यांमध्ये मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र तोपर्यंत या दोन्ही महिला नेत्यांच्या मारहाणीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात पसरले.
काँग्रेसच्या माजी महापौर पारुल त्रिवेदी आणि माजी महिला अध्यक्षा यांच्यात काही कारणामुळे वाद सुरु झाला. यावेळी दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकींचा गळा पकडला. पार्टीतील वर्चस्वामुळे दोन्ही नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. नेमकं रॅलीच्या वेळी दोन्ही महिला नेत्या आमनेसामने आल्या. त्यावेळी सुरुवातीला दोघींमध्ये भांडणं झालं. हा वाद वाढतच गेला. त्यानंतर दोन्ही एकमेकींच्या अंगावर धावल्या. तेव्हा काँग्रेस नेते भरतभाई बुढेलिया यांनी दोन्ही महिला नेत्यांना वेगळं करुन परिस्थिती आटोक्यात आणली. हाणामारीत माजी महापौर पारुल त्रिवेदी यांच्या डोळ्याला दुखापत झाली.
जखम झाल्यामुळे माजी महापौर पारुल त्रिवेदी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र भररस्त्यात काँग्रेसच्या दोन्ही महिला नेत्या एकमेकांना भिडल्या आणि त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. काँग्रेसचे अनेक नेते या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यापासून पळ काढत आहेत. काँग्रेसच्या महिला नेत्यांच्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानं भाजपाला काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली. घडलेल्या घटनेवरुन माजी महापौर पारुल त्रिवेदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात असं म्हटलं जात आहे.