कृषी विधेयकावरून विरोधकांचा यू टर्न; शरद पवारांचं नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डागली तोफ
By प्रविण मरगळे | Published: February 8, 2021 11:21 AM2021-02-08T11:21:37+5:302021-02-08T11:25:35+5:30
किसान रेलच्या माध्यमातून गावातील शेतकरी मुंबईच्या बाजारात माल विकू लागला आहे असं पंतप्रधानांनी सांगितले.
नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनावर विस्तृत चर्चा होणं गरजेचं आहे. शेतकरी आंदोलन कशासाठी यावर सगळेच गप्प, आंदोलन कसं चाललंय वगैरे यावर बोलले, पण मूलभूत चर्चा झाली असती तर जास्त बरं झालं असतं. कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं कुणी देत नाही..माजी पंतप्रधान देवगौडा यांचे आभार मानतो, त्यांनी चर्चेला गंभीर स्वरूप दिलं..सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक केलं..ते शेतकरी प्रश्नांशी जोडलेले आहेत. शेतीची मूलभूत समस्या काय, त्याची मुळं शोधली पाहिजेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सांगितलं.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आल्यावर कर्जमाफीचा कार्यक्रम घोषित केला जातो, हा निवडणुकीचा कार्यक्रम असतो की शेतकऱ्यांचा हे कळत नाही, या कर्जमाफीचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होत नाही, ना तो कर्ज घेतो, ना त्याचं कोणत्या बॅकेत खातं असतं, मग अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नाही, सिंचनाची सुविधाही छोट्या शेतकऱ्यांच्या नशिबी आली नाही. लहान शेतकऱ्यांचा विचार कोण करणार? २०१४ नंतर आम्ही पीक विमा योजनेचा विस्तार केला, त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळाला असं त्यांनी सांगितले.
तसेच मागील ४-५ वर्षात ९० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले, कर्जमाफीपेक्षा हा आकडा मोठा आहे. कर्ज, सिंचन आणि खतं पुरवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला. किसान क्रेडिटच्या माध्यामातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा दिला. पंतप्रधान सन्मान निधी योजना आणली. १० कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. बंगालमध्ये राजकारण झालं नसतं तर तेथील शेतकऱ्यांनाही हा लाभ मिळाला असता. पंतप्रधान ग्रामरस्ते योजनेवर भर दिला. किसान रेलच्या माध्यमातून गावातील शेतकरी मुंबईच्या बाजारात माल विकू लागला आहे असं पंतप्रधानांनी सांगितले.
राजकारणासाठी विरोधकांनी यू टर्न घेतला
अनेक सरकारने कृषी सुधारणेबाबत भाष्य केले आहे, सर्वांनी यावर भाष्य केले आहे. कोणीही सुधारणांचा विरोध केला नाही. मागील २ दशकांपासून देशात कृषी सुधारणांवर चर्चा झाली, प्रत्येक वेळी यावर चर्चा करण्यात आली. अडथळे आणण्यामुळे प्रगती होत नाही. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला घेरलं असतं, पण शेतकऱ्यांनाही समजावणं गरजेचे आहे, काळानुसार बदलणं गरजेचे होते, राजकारणासाठी युटर्न घेतला जातोय असा टोला पंतप्रधानांनी शरद पवार आणि विरोधकांना लगावला. जे लोक राजकीय प्रतिक्रिया देत आहेत, त्यांनीही कृषी विधेयकवर अनेक सुधारणा केल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
राष्ट्रपतींच्या भाषणावेळी अनेकजण अनुपस्थित राहणं म्हणजे लोकशाहीच्या प्रतिमेला धक्का पोहचवण्यासारखं आहे. मात्र तरीही अनेकांनी राष्ट्रपतींचं भाषण ऐकलं नाही नाही तरीही त्यावर खूप काही बोलले.
कोरोनासारख्या संकटाचा कोणी विचारही केला नाही
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आत्मनिर्भर भारत दिसला, काही जण भाषण न ऐकताच निघून गेले
अभिभाषणावेळी उपस्थित राहिले असते तर बरं झालं असतं, राष्ट्रपतींचे भाषण मार्ग दाखवणारे होते,
कोरोना लढाई जिंकण्याचं श्रेय कोणत्या एका सरकार नव्हे, व्यक्तीचं नाही तर देशाचं आहे.
गरिब महिलाही रस्त्यावरच्या झोपडीत दिवे लावून प्रार्थना करत होती, त्यांच्या भावनांचीही खिल्ली उडवली गेली
कोरोना योद्धांचा आदर केला पाहिजे त्यांचा अपमान नाही
आज संपूर्ण देशाचं लक्ष भारताकडे लागले आहे, देशाला लस पोहचवण्याचं काम भारताने केलं.
कोरोना काळात देशाची अंतर्गत ताकद किती, एकाच दिशेने आम्ही शक्ती लावून काम कसं करू हे दाखवून दिलं.
केंद्र आणि राज्याच्या एकत्र सहकार्यामुळे झालं, त्यामुळे राज्य सरकारांचेही विशेष आभार मानतो
देशाच्या लोकशाहीवर अनेकांनी शंका उपस्थित केली, परंतु त्यांच्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही
भारताची लोकशाही समजून घ्या, आपली लोकशाही कोणत्याही माध्यमातून पाश्चिमात्य संस्कृती नाही तर ह्युमन इंन्स्टिट्यूट आहे.
भारताच्या इतिहासात लोकशाहीची अनेक उदाहरणं मिळतात, भारताचा राष्ट्रवाद ना स्वार्थी, ना आक्रमक आहे ते सत्यम, शिवम् सुंदरम या प्रेरणेतून बनलेले आहे.
भारत लोकशाहीची जन्मभूमी आहे ही गोष्ट येणाऱ्या पिढीला शिकवायला हवी.
आणीबाणीचा काळ आठवा, देशाची अवस्था जेलमध्ये परावर्तित झाली होती, परंतु लोकशाहीत संधी मिळताच लोकांनी त्याला धडा शिकवला.
कोरोनाकाळातही भारतात अनेक जण गुंतवणूक करत आहे, एकीकडे निराशाचं वातावरण आहे तर दुसरीकडे जग भारताकडे आशेने पाहत आहे.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, ४ लाख कोटींचा व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून होत आहे, डिजिटल इंडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, दर महिन्याला ४ लाख कोटींचा व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होऊ लागला आहे. याची ताकद बघा.
सर्जिकल स्ट्राईक असो वा एअर स्ट्राईक...भारताची क्षमता जगाने पाहिली आहे. कोणत्याही परिस्थितीत भारत स्वत:चं रक्षण करण्यास समर्थ आहे. जल, अंतराळ, संरक्षण क्षेत्रात भारताची प्रगती.
माझं सरकार गरिबांचे सरकार आहे, गरिबीपासून मुक्तता मिळवणंच हे आमचं लक्ष्य आहे. एकदा आत्मविश्वास लोकांमध्ये आला तर गरिब स्वत: गरिबीला आव्हान देईल, १० कोटीपेक्षा जास्त शौचालय बनले, ८ कोटीपेक्षा जास्त मोफत गॅस कनेक्शन दिले,
जगातील कोणत्याच देशात आव्हानं नाहीत असं होत नाही, प्रत्येक देशात आव्हान असतात, आपण समस्येचा भाग बनावं की समाधानाचा भाग बनावं हे स्वत: ठरवावं लागतं, वर्तमानासाठी आणि भविष्यासाठीही काम करायचं आहे.