सातारा – मराठा आरक्षणावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर टीका केली, ‘एक राजा बिनडोक’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी खासदार उदयनराजेंचे नाव न घेता टीका केली, तसेच त्यांना राज्यसभेवर कसं पाठवलं? असा सवाल उपस्थित केला, त्यावरुन साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याबाबत सातारा जिल्हा परिषदचे माजी सदस्य संदीप शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांवर घणाघाती टीका केली आहे. संदीप शिंदे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना एकही आमदार निवडून आणता आला नाही, ज्या महामानवाने या देशाला घटना दिली, त्यांचा नातू म्हणूनही तुमची ओळख निर्माण करता आली नाही, महाराष्ट्रात कुठेही उमेदवारी देताना प्रकाश आंबेडकर सेटलमेंट करतात हा आरोप आहे, आम्ही आरपीआयमध्ये काम करतानाही हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत हेदेखील आम्हाला माहिती नव्हते, कार्यकर्त्यांना सन्मानाने जय भीम बोलत नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कधीही पुष्पहार घालत नाही, त्यामुळे बाबासाहेबांचे नातू आहात का? असा प्रश्न पडतो अशी टीका त्यांनी टीव्ही ९ च्या मुलाखतीत केली आहे.
उदयनराजे समर्थकांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा
छत्रपती घराण्यावर टीका करण्याची आपली कुवत आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिष्यवृत्तीसाठी छत्रपतींचे वंशज शाहू महाराज यांनी मदत केली होती, हे त्यांनी विसरू नये, काहीही असो, राजकारण बाजूला राहूद्या, छत्रपती घराणं आहे त्याचा आदर केलाच पाहिजे, आपण काय बोलतोय याचं भान ठेवायला हवं, छत्रपती घराण्यावर कोणी टीका करत असेल तर त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही - साईराज कदम, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात जे बेताल वक्तव्य केलं त्यांचा जाहीर निषेध करतो, छत्रपती उदयनराजे सर्व जातीजमातीच्या लोकांना एकत्र घेऊन काम करतात, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून काम करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या वंशजांबद्दल बेताल बोलणं हे अशोभनीय आहे, यापुढे प्रकाश आंबेडकरांनी स्वत:च्या तोंडाला लगाम घालावा अन्यथा उदयनराजे समर्थक राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तुम्हाला राजे स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. - सुनील कातकर, माजी शिक्षण सभापती
राजेंनी आजपर्यंत कधीच कोणत्या व्यक्तीचं काम करताना जातीधर्म पाहिला नाही, १९९० पासून आम्ही राजेंसोबत काम करतोय, जो व्यक्ती अडचणीत आहे त्याला मदत करण्याचा राजेंचा स्वभाव आहे. साध्या कार्यकर्त्याचं कामही प्रकाश आंबेडकरांनी केलं नाही, वंचित समाजाचे प्रश्न उदयनराजे संसदेत मांडतील यासाठीच त्यांना खासदारकी मिळाली, राजेंवर टीका करायची आणि काम करतोय दाखवायचं हे काम प्रकाश आंबेडकर करतायेत, यापुढे असं वक्तव्य कराल तर उदयनराजे समर्थक तुम्हाला फिरू देणार नाही - नितीन शिंदे, राजे प्रतिष्ठान, कार्याध्यक्ष
उदयनराजेंची जनतेशी जोडलेली नाळ आहे, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेतलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जनता प्रकाश आंबेडकरांना जाब विचारल्याशिवाय गप्प बसणा नाही - रंजना रावत – माजी नगराध्यक्ष, सातारा नगरपालिका
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही, एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु ते आरक्षणसोडून इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे.