मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील संघर्षाने राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर या शब्दाचा वापर केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. आता या वादात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव पी. मुरलीधर राव यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव जी, गलत नंबर डायल हो रहा है अशा शब्दात टीका केली आहे.
मुरलीधर राव यांनी सोमवारी विधान केले की, हरामखोर सारख्या शब्दाचा राजकीय संवादात वापर होणे हे शोभत नाही. हा शब्दा अशा लोकांविरोधात वापरला जातोय जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाहीत. ते फक्त सुशांत सिंग राजपूत आणि पालघर मॉब लिचिंग प्रकरणात न्याय मागत आहेत आणि बॉलिवूडमध्ये पारदर्शकतेची मागणी करतायेत असं ते म्हणाले.
त्यासोबत महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि बाळासाहेब ठाकरेंची जन्मभूमी आहे. याठिकाणी राजकीय युद्ध जिंकण्यासाठी माणुसकी सोडणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री उद्धव जी, तुम्ही चुकीचा नंबर डायल करत आहात, तसेच सुशांत सिंग प्रकरणात बॉलिवूडचे संबंध, ड्रग्स, दुबई हे कनेक्शन बाहेरच्या देशांशी जोडले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी NIA कडून करण्यात यावी अशी मागणीही भाजपा महासचिव मुरलीधर राव यांनी केली आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा
मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.
अमृता फडणवीसांनीही संजय राऊतांना लगावला टोला
संजय राऊत म्हणाले होते की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये पाहिली आहेत. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो असं ते म्हणाले. राऊतांच्या या स्पष्टीकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत असं सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टोला लगावला आहे.