पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीचे हजारो लोक आलेत, ते येऊ द्यात. बारामतीची भानामती आता चालणार नाही. मावळ ही मावळ्यांची भूमी आहे. मावळचा गोळीबार कोणी केला? हे सर्वांना माहीत आहे. मावळ्याला मत द्यायचे की मावळचा गोळीबार करणाऱ्याला द्यायचे हे ठरवायला हवे. मावळमध्ये कोणतीही दादागिरी सहन केली जाणार नाही. गुंडगिरी मोडून काढू, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळेवाडीत केली. काळेवाडी फाट्यावरील मैदानात भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री विजय शिवतारे खासदार, अमर साबळे, संपर्क प्रमुख डॉ. नीलम गोºहे, शिवसेना नेते संजय राऊत, भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, रवींद्र मिर्लेकर, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात भगवे तुफान सुरू आहे. युतीपूर्वी विरोधक लाकडाची होडी घेऊन दिल्लीकडे निघाले होते. आता त्यांची अवस्था केवीलवाणी झाली आहे. निकाल येण्यापूर्वीच ते ईव्हीएमवर खापर फोडू लागले आहेत. पराभव मान्य केला आहे. अनेक वर्षे संपूर्ण देशात दरोडेखोर होते. दरोडेखोरांचे राज्य आपण उद्ध्वस्त केले. बकासुराच्या हाती सत्ता द्यायची हे ठरविण्याची निवडणूक आहे.’’देशावर हिंदुत्वाचा तेजस्वी झेंडा फडकवण्यासाठी ही निवडणूक आहे. मावळ्यांची भूमी आहे. काही वर्षांपासून मावळची भूमी डाकूची भूमी झाली आहे, तिला दरोडेखोरांच्या जाचातून मुक्त करायचे आहे. कायदा सुव्यवस्था समतेसाठी मोदी यांना निवडून द्यायचे आहे. बारामतीचे नट बोल्ट सुटे केले आम्ही ते कुठे पाठवायचे ठरवू.- संजय राऊत, शिवसेना नेतेकोणतीही राजकीय परंपरा नसताना सर्वसाधारण कार्यकर्ते यास काम करण्याची संधी शिवसेना प्रमुखांनी दिली. रेल्वे, स्मार्ट सिटी, मेट्रो, चापेकर बंधूचे टपाल तिकीट, माथेरान रेल्वे, पासपोर्ट कार्यालय सुरू केले. विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न, यासाठी पाठपुरावा करीत आहे. विरोधकाकडे कोणताही विषय नाही. केवळ टीकाच करू शकतात.- श्रीरंग बारणे, खासदारमाजी खासदार गजानन बाबर स्वगृही परतलेमावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर हे पुन्हा स्वगृही परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. २०१४ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत असताना बाबर यांनी सलग तीनदा नगरसेवक, दोनदा आमदार आणि एकदा खासदारकी शिवसेनेकडून भूषविली होती़आमचं ठरलंय : आमचं ठरलंय, या वाक्याचा आधार घेऊन ठाकरे म्हणाले, ‘‘देशद्रोह्यांना फाशी द्यायची, पाकिस्तानने आगळीक केल्यावर त्याचे कंबरडे मोडायचे, मोदींना पंतप्रधान करायचं आहे. बारामती आणि मावळमध्ये एकाच घरातील सगळे उभे आहेत, त्यांनाही घरी बसवायचं, हेही आमचे ठरलंय.’’पवारांचे पाडापाडीचे राजकारणशरद पवार यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले,‘‘पवारांनी आजपर्यंत पाडापाडीचेच राजकारण केले आहे. १३ दिवसांचे १३ महिन्यांचे सरकार कोणी पडले? ’’
मावळमधील दादागिरी मोडून काढू- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 1:22 AM