पुणे : मी शिवसैनिक असताना केलेली आंदोलने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहितीही नाहीत. त्यांच्यापेक्षाही मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा अधिक लाडका होतो. उद्धव ठाकरे वगळता कोणत्याही शिवसैनिकाची माझ्याविषयी तक्रार नाही. फक्त उद्धव यांनाच माझ्यात काही चांगलं दिसत नाही अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुण्यात केली. भाजप प्रवेश करतानाही शिवसेना अडसर निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला,'
पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'युवर्स ट्रूली नारायण राणे' कार्यक्रमात ते बोलत होते. नारायण राणे यांच्या 'झंझावात' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी राणे यांनी शिवसेनेच्या सद्यःस्थितीवर टीका केली. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे होते तोवर त्यांची पक्षावर पकड होती. ते प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखायचे. आताची शिवसेना व्यावसायिक झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत.