नवी दिल्ली - शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई केली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली. पालिकेच्या कारवाईनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात 'अयशस्वी' मुख्यमंत्री आहेत असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं आपलं नाव बदलून 'बाबर सेना' करावं असं देखील म्हटलं आहे. यासोबतच यशस्वी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं असा सल्लाही निखिल आनंद यांनी दिला आहे.
"उद्धव ठाकरे इतक्या खालच्या पातळीवर जाणारे व्यक्ती असतील हे जनतेला माहीत नव्हतं"
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील हे देशाच्या जनतेला माहीत नव्हतं. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत बडबड करत आहेत आणि सोबतच मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका पक्षपाती कारवाई करत आहेत, ती थेट उद्धव ठाकरेंच्या निर्देशावरून आणि इशाऱ्यावरूनच होत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा आणि विचारधाराही पणाला लावली" असं निखिल आनंद यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेवरही केली जोरदार टीका
"मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्याविरुद्ध उभे राहिले. सीबीआय चौकशीचा विरोध करत राहिले, इतकंच नाही तर बॉलिवूडच्या 'बाबा - बेबी - मुव्ही माफिया - ड्रग माफिया आणि अंडरवर्ल्ड टोळक्यातील आरोपींसोबत ते उभे राहिलेत. आश्चर्य वाटतं की आपल्या राजकीय निराशेची कुंटा मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक लोकप्रिय महिला कलाकार असलेल्या कंगना राणौत हिच्याशी दोन हात करण्यासाठी आपलं संपूर्ण सरकार, पोलीस - प्रशासन व्यवस्था आणि आपला पक्ष शिवसेनेलाच दावणीला बांधला आहे' असं म्हणत निखिल आनंद यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"
धक्कादायक! एका महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नोकरी गेल्याने दाम्पत्याची आत्महत्या
"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात
मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर
तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल