मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज मला वाटत नाही. पण अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत हे विसरुन चालणार नाही", असं सांगितले. याचबरोबर नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण, ते का करायचं? असा सवाल करत यापुढे असे काही होणार नसल्याचे संकेत दिले होते. मात्र, काही तासांतच उद्धव ठाकरेंनी यूटर्न घेतला आहे.
पहिल्या लॉकडाऊननंनतर महाराष्ट्रातील वाढलेल्या कोरोना रुग्णांवरून राजकारण सुरु झाले होते. यावेळी ठाकरे व त्यांच्या मंत्र्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत पदेशातून येणाऱ्या विमानांबाबत काहीच माहिती दिली नसल्याची टीका केली होती.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटले होते की, मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे. जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे. गेल्या मार्चपासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट दिसायला लागले. त्यानंतर त्याची वाढ किती झाली, कमी कसे झाले, दुदैवाने मृत्यू किती झाले हे सर्व काही आपण जगासमोर अत्यंत पारदर्शकपणे ठेवलेलं आहे.
युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये आजपासून आधीपेक्षा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. का करावा लागला? आता न्यू इयर येणार. जसं आपण शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत करणार तसंच तेही करणार. हा टप्पा तिथे गर्दीचा असतो. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाऊन केलाय. कोरोनाने तिकडे आपला अवतार बदलला आहे. काळाप्रमाणे त्याने त्याची गती वाढवली आहे. तिथे हीच भीती आहे की लॉकडाऊन नाही केला तर झपाट्याने पसरणारा व्हायरस गेल्या वेळेपेक्षा अधिक मोठा हाहाकार पसरवू शकेल. अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण, ते का करायचं? ७०-७५% लोकं चेहऱ्यावर मास्क घालून फिरत असतात. पण उरलेल्यांना मी सूचना देतो की आपणही ही बंधन पाळा. कारण यामुळे केवळ आपल्यालाच धोका निर्माण होतो असं नाही पण जे ७०-७५% लोकं सावधानता बाळगत आहेत त्यांना हा धोका होऊ शकतो, आपल्या कुटुंबियांना हा धोका होऊ शकतो. मला असं वाटतं की आजार आणि इलाजापेक्षा काळजी घेतलेली बरी, असे ते म्हणाले होते.