Sillod Vidhan Sabha Election news 2024: शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अब्दुल सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट झाले आहे. अब्दुल सत्तारांविरोधात ठाकरेंनी भाजपामधून आलेल्या नेत्याला मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट केले. मला सिल्लोडमध्ये शिवसेनेचा आमदार हवाय, असे म्हणत त्यांनी उमेदवाराच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे अब्दुल सत्तारांसाठी विधानसभेची निवडणूक अवघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांनी शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (यूबीटी) प्रवेश केला. भाजपाचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने समीकरणे बदलली होती. ही जागा शिवसेनेकडे गेली. यावेळी अब्दुल सत्तार हेच महायुतीचे उमेदवार असणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे बनकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मला तुमच्याकडून वचन हवंय; ठाकरे काय म्हणाले?
सुरेश बनकर यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही ज्या मतदारसंघाचा (सिल्लोड) उल्लेख केला, त्या मतदारसंघासाठी मशाल तुमच्या हातामध्ये दिली आहे. खरं म्हटलं तर गेल्या वेळी आम्ही चूक केली होती. पण आता केलेली चूक सुधारायला हवी आणि म्हणूनच मशाल हातामध्ये दिली आहे. ही जी जुलूमशाही आहे, गद्दारी आहे. हा त्या मतदारसंघाला लागलेला कलंक आहे. तो कलंक जाळून टाकण्यासाठी मशाल तुमच्या हातात दिली आहे. मी प्रचाराला येणार, पण मला तुमच्याकडून एक वचन पाहिजे की, मला तिथून (सिल्लोड) आपल्या शिवसेनेचा आमदार पाहिजे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्तारांसमोर दुहेरी आव्हान?
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेल्या अब्दुल सत्तारांना यावेळची विधानसभा निवडणूक जड जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला आहे. अशी चर्चा कायम होत असते की, दानवे आणि सत्तारांचं आतून साटलोटं आहे. सत्तार लोकसभेला मदत करतात, तर दानवे विधानसभेला. पण, यावेळी दोघांमध्ये दुरावा आला आहे. त्यातच भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा अब्दुल सत्तारांना विरोध वाढला आहे.
अब्दुल सत्तार महायुतीचे उमेदवार असणार असले, तरी भाजपाची साथ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीची सगळी जबाबदारी स्वतःच पेलावी लागणार आहे. कारण रावसाहेब दानवे यांच्याकडून सत्तारांना फारशी साथ मिळण्याची शक्यता नाही, असे बोलले जात आहे. बनकर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानात उतरणार असल्याने भाजपाच्या मतांचं विभाजन अटळ आहे. त्यामुळे एकीकडे दानवे, तर दुसरीकडे ठाकरे असे दुहेरी आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे.