मुंबई - स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं आहे.(BJP Keshav Upadhye Target Thackeray government & CM Uddhav Thackeray)
केशव उपाध्ये म्हणाले की, आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं त्यासारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR एजेंन्सी वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचसोबत वास्तव माहिती लपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा. कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? असा चिमटाही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काढला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा ‘लगता है निशाना सही जगह लगा है‘ शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जो खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे होते. येथे बिचारे नितीन राऊत असो की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असो की अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र ‘बेगाने शादी में….’ नाचत राहतात असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र लढतोय चांगली लढाई, मोदींकडून कौतुक!
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली व दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत कौतुक केलं असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य कसे नियोजन करीत आहोत, त्या विषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून, त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीसांची टीका
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र ट्विटरवर शेअर केले. यामध्ये "मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावे", अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.