मुंबई - संपूर्ण जगात लाटांमागून लाटा येत आहेत. आणखी किती लाट येणार कल्पना नाही. दुसरी लाट आपण अनुभवतोय. तिसरी लाट येणार नाही असं कोणी सांगू शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्राने तयारी केली आहे. तिसरी लाट आली तरी त्याचे गंभीर आणि घातक परिणाम होणार नाही यासाठी महाराष्ट्र कंबर कसून तयार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना जशी जशी डोस उपलब्ध होईल तसं लसीकरण केले जाईल. प्रत्येक राज्यासाठी वेगळं अँप तयार करून मुख्य कोविन अँपला जोडावं. हे झालं तर लसीकरण सुरळीत होईल. अँपवर नोंदणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रावर जा, जून जुलैपर्यंत लसीचा साठा वाढेल. पण लसीकरण केंद्रावर झुंबड दिसतेय ती गर्दी करू नका. कोविडच्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करून काही उपयोग होणार नाही. सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची तयारी पूर्ण केली आहे. लसीकरण केंद्रच कोविड पसरणारं मार्ग होतोय का याची भीती वाटतेय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचसोबत मी कधीही कुठेही राजकारण आणणार नाही, माझ्या आणि जनतेच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर जे आरोप करतायेत त्यांना उत्तर देण्यासाठी जाहीर सभा घेईन पण आता ती वेळ नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तिसरी लाट थोपवल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाऊनसारखे निर्बंध लावले नसते तर काय परिस्थिती झाली असती हे देशाच्या इतर राज्यात दिसतंय. व्हायरस त्याच्या परिने घुसण्याचा प्रयत्न करतोय. देशात महाराष्ट्र सर्वाधिक लसीकरणात पुढे आहे. चाचण्यांमध्ये पुढे आहे. रुग्णवाढीत दुर्दैवाने आपण पुढे आहोत. ही परिस्थिती पाहता लसीकरण महत्त्वाचं आहे. २५ वर्षावरील सर्वांना लस द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याची घोषणा केली. या वयोगटातील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी केंद्राने राज्यावर टाकली आहे. आपल्या राज्यात ६ कोटी नागरिक १८ ते ४४ वयोगटातील आहेत. त्यासाठी १२ कोटी लसीचे डोस आवश्यक आहे. या लसीचे एकरकमी किंमत राज्य सरकार देणार आहे. लसीचा पुरवठा करण्यावर मर्यादा आहे. ज्या ज्या कंपन्यांना परवानगी मिळेल सगळ्यांना राज्य सरकार संपर्क साधत आहे. ५० टक्के उत्पादन साठा केंद्राकडे राखीव आहे तर उर्वरित ५० टक्क्यात खासगी हॉस्पिटल, राज्य सरकार आहेत. आपण जास्तीत जास्त लस विकत घेण्याचा प्रयत्न करतोय. लस जशी मिळेल तशी उपलब्ध करून जनतेला देणार आहोत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
गेले वर्षभर आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लागतायेत. त्यात काही दुर्घटना घडते. स्वत:च्या जीवाचा विचार न करता आरोग्य कर्मचारी काम करत आहे. ज्यांच्यासाठी आम्ही आटोकात प्रयत्न करून त्यांचे जीव वाचवतोय तेच ऑक्सिजन नसल्याने तडफडून जातायेत हे पाहून डॉक्टरांच्या डोळ्यातून पाणी येते. जम्बो कोविड सेंटरचं फायर ऑडिट, स्क्चरल ऑडिट करा. कुठेही गडबड असेल तर तात्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणा. दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करा.
जी आता बंधनं लावली होती त्यापेक्षाही कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का असं हायकोर्टाने विचारलं आहे. परंतु लॉकडाऊनची गरज वाटली तरी ती वेळ तुम्ही येऊ देणार नाही ही अपेक्षा आहे. या लॉकडाऊनचा काय उपयोग झाला? मात्र ज्या पटीने रुग्णवाढ होत होती जर बंधन घातली नसती तर ९-१० लाख रुग्ण झाले असते. सक्रीय रुग्णांची संख्या सहा-साडे सहा लाखापर्यंत स्थिरावली. जी वाढ होत होती ती काही प्रमाणात कमी झाली.
जो संयम तुम्ही दाखवतोय तो दाखवला नसता तर आज महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली असती. नाईलाजाने आपली रोजी मंदावेल पण रोटी थांबणार नाही. आपल्यापेक्षा कोणी काही चांगल्या गोष्टी केल्या तरी त्याचं अनुसरून नक्की करेन. पण सल्ला देणाऱ्यांनी सरकारने काय काय केले हेदेखील पाहावे.
जेव्हा आपल्या राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात शिरकाव केला तेव्हा केवळ २ प्रयोगशाळा होत्या पण आज प्रयोगशाळांची संख्या ६०० पर्यंत वाढवली. चाचणी वाढली. जम्बो सेंटर उभारले आहेत. आपत्कालीन हॉस्पिटल्स उभारले. हॉटेलमध्ये प्राथमिक स्वरुपात हॉस्पिटल उभे केले. साडे पाच हजार कोविड सेंटर उभारली. बेड्स ४ लाख २१ हजार केले. गेल्यावर्षी ३ हजार ७४४ व्हेंटिलेटर होते पण २९ एप्रिल २०२१ तारखेपर्यंत ११ हजार ७१३ व्हेंटिलेटर निर्माण केलेत.
राज्याची रोजची ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता १२०० मेट्रीक टन आहे. पण १७०० मेट्रीक टनची गरज आहे. हजारो किमीवरून ऑक्सिजन आणावे लागत आहेत. वेळेवर ऑक्सिजन आणणं ही मोठी कसरत आहे. सुदैवाने रुग्णसंख्या स्थिरावली आहे. आणखी किती दिवस बाहेरून ऑक्सिजन आणणार असा प्रश्न आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली संपूर्ण राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे. एखादा प्लांट उभारण्यासाठी १५-२० दिवस लागतात. येत्या काही दिवसांत राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. कोविडची तिसरी लाट आली तरी तेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही अशी व्यवस्था केली आहे. लिक्विड ऑक्सिजन ने आण करता येते. परंतु गॅस ऑक्सिजन वाहून नेता येत नाही. मग जिथे जिथे गॅस ऑक्सिजन आहेत त्याच्या शेजारी कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकार पावणे ३०० ऑक्सिजन प्लांट लावणार आहोत.
सगळ्यांंना रेमडेसिवीर पाहिजे. आपल्याला सरासरी ५० हजार रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्राकडून होत होती. २६, ७४८ रेमडेसिवीर केंद्राकडून मिळाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली त्यानंतर ४३ हजार रेमडेसिवीर केंद्राकडून पाठवण्यात येत आहे.
रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर करू नका. गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम नाकारता येत नाही. रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचं की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्या.
साडे पाच हजार कोटींचे पॅकेज मी जाहीर केले होते. सुरूवातीला शिवभोजन थाळी १० रुपयात सुरू होती ती ५ रुपये केली. त्यानंतर आता ही शिवभोजन थाळी मोफत दिली जात आहे. १५ लाखांहून अधिक लोकांनी शिवभोजनचा लाभ घेतला आहे. वर्षभरात ४ कोटींपेक्षा अधिक लोकांनी शिवभोजनचा लाभ घेतला. राज्यात ८९० केंद्रे आहेत.
७ कोटी लाभार्थींना मोफत गहू, तांदूळ वाटप सुरू झालं आहे. कामगारांना प्रत्येक दिड हजार रुपये देण्याची घोषणा केली. ९ लाखाहून अधिक कामगारांच्या खात्यात रक्कम जमा झाली. आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब २ हजार अशाप्रमाणे खावटी देण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपण कुठेही कमी पडत नाही, कमी पडू देणार नाही.
ज्यांनी ज्यांनी बलिदान करून रक्त सांडून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली त्यांना विनम्र अभिवादन, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगार उतरले होते, तमाम महाराष्ट्र उतरला होता. शेतकरी आणि कामगार यांचे मोलाचे योगदान महाराष्ट्रासाठी आहे. या सर्वांना मानाचा मुजरा करतो.
गेल्यावर्षी १ मे आणि यंदाही १ मे दोन्ही दिवशी लॉकडाऊन आहे. २००६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्ष पूर्ण झाली होती. तो सुवर्ण महोत्सव आजही आठवतोय. बाळासाहेब होते, लतादिदी होत्या. तो सुवर्ण क्षण आज डोळ्यासमोर उभा राहतोय. हे दिवस जातील पुन्हा आपण सुवर्णक्षण साजरा करू