मुंबई – पालघरमधील साधुंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी भाजपा आमदार राम कदम यांच्याकडून खारपासून ते गडचिंचले गावापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत राम कदम यांना ताब्यात घेतलं, त्यानंतर काही वेळानंतर राम कदम यांची सुटका करण्यात आली, यावेळी माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली.
यावेळी राम कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, पालघरमध्ये साधुंच्या हत्येला इतके दिवस झाले तरी कारवाई नाही, हत्येवेळी राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते, घटनेच्या चौकशीआधीच महाराष्ट्र सरकारने मॉब लिचिंग असल्याचं सांगून टाकलं, सरकारला हा तपास सीबीआयला सोपवावा लागेल. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, याठिकाणी संतांवर अन्याय सहन करणार नाही. हे सरकारने लक्षात ठेवावं असा इशारा त्यांनी दिला.
तर कोरोनात आंदोलन करु नये यासाठी पोलिसांनी जनआक्रोश आंदोलनाला अडवलं, पालघरमध्ये ज्यापद्धतीने साधूंवर हल्ला झाला, हत्या झाली परंतु आरोपींवर कारवाई होत नाही म्हणून भाजपा आमदार राम कदम यांनी आंदोलन पुकारलं, हिंदुस्तान साधुसंताचा देश आहे, साधुसंतावर अन्याय होऊ नये यासाठी आंदोलन छेडलं होतं, पालघरचा तपास सीबीआयकडे जायला हवा. महाराष्ट्रात जे सरकार बसलं आहे, त्यांची साधुंना न्याय देण्याची इच्छा नाही असं नारायण राणेंनी सांगितले.
भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात, राणेंची पोलीस ठाण्यात धाव
त्याचसोबत भाजपाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपदावर बसले, हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नाही, पिंजऱ्यात बसून राहतात त्यामुळे राम कदम यांना आंदोलन करावं लागतंय. २१२ दिवस होऊनही पालघरचा तपास पूर्ण होत नाही, त्याला विरोध करण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार? कुठल्याही परिक्षेला बसत नाही, पास होत नाही, त्यामुळे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असं शिवसेना नेते कायम म्हणतात. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाही, पदासाठी तडजोड करणारे आहेत. त्यामुळे शिवसेना हिंदुत्व असं समीकरण नाही असा टोलाही नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.