मुंबई – मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली, मुख्यमंत्रिपदावरून भाजपासोबत बिनसल्याने शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला केंद्रातील सत्तेचा वाटा सोडावा लागला, एनडीएतून बाहेर पडत शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांने राजीनामा दिला. राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग देशात होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी असते.
भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं दिल्लीतील राजकीय नेते बोलत असतात. पण अद्याप या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यातच सपा नेते रामचरित्र निषाद यांनी मुंबई महापालिका आणि येणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एका नवीन राजकीय प्रयोगासाठी प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
एकीकडे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची जंगी तयारी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. भाजपाने यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबईची सत्ता ताब्यात घ्यायची असा चंग बांधला आहे. तर गेल्या २५ वर्षापासून महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने गड कायम राखण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. अद्याप मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण काँग्रेसने आजतागायत अनेकदा मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं सांगितले आहे. इतकचं नाही तर काँग्रेसकडून सातत्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विविध आरोप करण्यात येत आहेत.
रामचरित्र निषाद हे भाजपाचे मछली शहराचे खासदार होते, मात्र मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांचे तिकीट कापल्याने नाराज होत निषाद यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. निषाद यांनी याबाबत सांगितले की, उत्तर भारतीय आता समजूतदार झाला आहे त्यामुळे तो भाजपाच्या प्रभावाखाली येणार नाही. आगामी काळात उत्तर भारतीय समाज त्याच आघाडीसोबत जाणार ज्याठिकाणी त्याची चिंता होईल, त्याला सुरक्षा मिळेल असं ते म्हणाले.
रामचरित्र निषाद यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे. सपाचे आमदार अबु आझमी हेदेखील सरकारमधील वाटेकरी आहेत. त्यामुळे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष पूर्ण ताकदीनं उतरणार आहे. यात महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी सपाने केली आहे. रामचरित्र निषाद यांचे तिकीट भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक असल्यानं कापलं होतं, त्यानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात निषाद यांनी प्रवेश केला होता