मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण (Pooja Chavan Suicide) तसेच मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे राज्य सरकारची नाचक्की झालेली आहे. तसेच या घटनांवरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक आहे. दरम्यान, आता खुद्द मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंगावर आलेल्या विरोधी पक्षाला शिंगावर घेण्याचे धोरण आखले आहे. आज सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिल्व्हासा येथील आमदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ( Uddhav Thackeray targets BJP over MP Mohan Delkar's suicide, said We are investigating Silvassa MP Mohan Delkar's suicide)उद्धव ठाकरे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाबाबत म्हणाले की, आम्ही सिल्व्हासामधील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करत आहोत. केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्व्हासामधील खासदारांच्या आत्महत्येबाबत विरोधी पक्ष बोलत नाही. मात्र राज्यात व्यवस्था नाही. सारे काही केंद्रावर अवलंबू आहे, अशी ओरड करत महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली होती. या सुसाइड नोटमध्ये भाजपाच्या काही नेत्यांची नावं असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर या आत्महत्येवरून राजकारणालाही तोंड फुटले होते. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती.