नवी दिल्ली - तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय एम करुणानिधी यांचे नातू, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपा नेत्यांबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. यासोबतच गंभीर आरोप देखील केला आहे. "पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली (Arun Jaitley) आणि सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचा मृत्यू झाला" असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी "सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका सभेत बोलत होते. पंतप्रधान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचं देखील म्हटलं आहे. "तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे" असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
नरेंद्र मोदींवर उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिलं आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सातत्याने विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर (BJP) सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता राहुल यांनी मोदी आणि अमित शहांवर (Amit Shah) निशाणा साधला आहे. "तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मोदी आणि शहांच्या पाया पडताना पाहणं असह्य" असल्याचं म्हणत राहुल यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "भाजपामध्ये मोठ्या नेत्याच्या पायाला स्पर्श करावा लागतो, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांपुढे वाकावं लागतं" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. "पंतप्रधान मोदी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या ताब्यात ठेवू पाहत आहेत. त्यांनी त्यांना आपल्या पायाला स्पर्श करण्यासाठी भाग पाडत आहेत. पण मी हे स्वीकारायला तयार नाही. निवडून आलेल्या प्रतिनिधीने अमित शहा यांच्या पायाला स्पर्श करणारा एक फोटो मी पाहिल आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे. चेन्नईमधील रॅलीमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर निशाणा साधला.
"हा अशा प्रकारचा संबंध हा भाजपामध्येच असू शकतो. येथे तुम्हाला पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या पायाला स्पर्श करावा लागतो. भाजपामध्ये नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यापुढे वाकावं लागतं. देशाचे पंतप्रधान तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यावर नियंत्रण ठेवताना आणि शांतपणे त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी भाग पाडताना जेव्हा मी पाहतो तेव्हा ते स्वीकारण्यास माझं मन तयार होत नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहापुढे झुकावसं वाटत नाही. पण त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांना असं करावं लागतं" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.