नवी दिल्ली : भाजपचे खासदार व दलित समाजाचे नेते उदित राज यांनी बुधवारी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. उदित राज यांच्याऐवजी भाजपने पंजाबी प्रख्यात गायक हंस राज हंस यांना उमेदवारी दिली. भाजपने उमेदवारी नाकारल्याने उदित राज यांनी मंगळवारीच आपल्या ‘व्टिटर हँडल’वरुन नावासमोरील चौकीदार हा शब्द हटविला होता.त्यांनी आपली पक्षाविषयीची नाराजीही जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी उदित राज यांनी कॉँग्रेस मुख्यालयाचा रस्ता धरला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉँग्रेसचे सदस्यत्व मिळताच त्यांनी भाजपवर हल्ला चढविला. आपले तिकिट कोणत्या आधारावर कापले गेले हे समोर आले पाहिजे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर डोळे झाकून विश्वास ठेवला. ‘इंडियन जस्टिस पार्टी’ हा स्वत:चा पक्ष भाजप मध्ये विलीन केला. मात्र ‘अपना दल’सारखे छोटे पक्ष आपल्यापेक्षा अधिक फायद्यात राहिले. मला भाजपचा दलित चेहरा म्हणून प्रसिध्दी दिली जात असे. दलितांच्या हक्कासाठी आपण आवाज उठवित राहिलो.याची शिक्षा तर नव्हे?‘एस.सी’, ‘एस.टी’ कायदा आणि ‘रोस्टर पॉइंट’ या मुद्यांवर दलितांनी आयोजिलेल्या ‘भारत बंद’ला आपण पाठिंबा दिला होता. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्याची मागणीही आपण लावून धरली. दलित आणि महिलांच्या हक्कांबद्दल आवाज उठविण्याची शिक्षा तर मला भाजपने दिली नाही ना? हे पक्षनेतृत्वाने स्पष्ट केले पाहिजे, असे ते म्हणाले.
उदित राज अखेर कॉँग्रेसमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 03:55 IST