नवी दिल्ली – संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या संकटकाळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता काँग्रेसनं देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असून त्यांच्या गायब होण्याची तक्रार थेट दिल्लीतील पोलीस ठाण्यात केली आहे.
काँगेसच्या नॅशनल स्टुड्येंट यूनियन ऑफ इंडियाने बुधवारी दिल्लीच्या पोलीस ठाण्यात अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. एनएसयूआय(NSUI) चे राष्ट्रीय महासचिव नागेश करियप्पा यांनी अमित अनिलचंद्र शहा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना म्हटलंय की, संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि देशातील नागरिक या महामारीच्या संकटात अडकला आहे. अशावेळी प्रस्थापित नेत्यांनी केवळ भारत सरकार किंवा भाजपा सरकारलाच उत्तर देणे बंधनकारक नाही तर देशातील नागरिकांनाही उत्तर देणे कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत २०१३ पर्यंत सत्ताधारी नेते नागरिकांना उत्तर देण्यास जबाबदार होते. परंतु त्यानंतर देशात भाजपाचं सरकार आलं. सत्तेत आल्यानंतर कार्यप्रणालीत बरेच बदल झाले. आता देशात काहीही झाले तरी त्याची जबाबदारी कोणताच नेता घेत नाही. आज कोरोनाच्या संकटकाळात देशाचे २ सर्वोच्च जबाबदार नेतृत्व गायब आहे. देशातील जनतेला त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे तेव्हा हे लोक गायब होतात असा टोला एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि मीडिया प्रभारी लोकेश चुगने लगावला आहे.
दरम्यान, अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की, फक्त भाजपाचे? असा सवाल उपस्थित करत नागेश करियप्पा म्हणाले की, आम्ही कोरोना काळात लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाणतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे सध्याचे सरकार आणि त्यांचे सर्वोच्च नेतृत्व गायब झाल्याबद्दल आम्ही एनएसयूआयने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना शोधलं जाईल आणि ते पुन्हा त्यांचे कर्तव्य निभावतील अशी अपेक्षा आहे असा चिमटाही काँग्रेसने भारतीय जनता पार्टी आणि अमित शहांना लगावला आहे.