- नितिन पंडीतभिवंडी - देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून ठाणे व रायगड जिल्ह्यात सोमवारपासून १६ ते २० ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत भाजपाचे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होणार आहेत. (Union Minister of State Kapil Patil's Jana Aashirwad Yatra from Monday)
ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदात सामील होण्याचा बहूमान आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने जन आशीर्वाद घेण्यासाठी भाजपाकडून यात्रा काढली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून ठाणे व रायगडमधील यात्रेचे नेतृत्व केले जाणार आहे.
ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून १६ ऑगस्ट रोजी यात्रेला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून यात्रा जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरेल. तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागातून यात्रा जाईल. चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरात यात्रा जाणार आहे. तर पाचव्या दिवशी २० ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होईल. या यात्रेबरोबरच संवाद, विविध योजनांचा आढावा जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, एमआयडीसीतील जमीन मालकांबरोबर बैठक, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद, स्वच्छता अभियान, दिव्यांग लाभार्थींशी चर्चा, भाजपाचे समर्थ बूथ अभियान आदी कार्यक्रमांमध्येही मंत्री कपिल पाटील यांच्यासोबत भाजपा नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.पाच दिवसांच्या या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून तब्बल ४५१ किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. त्याचबरोबर विविध १७३ कार्यक्रम होणार आहेत.