लखनौ - देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगरमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर भाजपाने या सेंगरला पक्षातून हाकलले होते. मात्र आता त्याच कुलदीप सिंह सेंगरच्या पत्नीला भाजपाने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. कुलदीप सिंह सेंगर याची पत्नी सध्या जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. २०१६ मध्ये ती जिल्हा परिषदेची अपक्ष अध्यक्ष बनली होती. कुलदीप सिंह सेंगर भाजपाचे आमदार होता. पण बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीत सेंगर हिला भाजपाने फतेहपूर चौरासी तृतीय मतदारसंघामधून जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय माजी जिल्हाध्यक्ष आनंद अवस्थी यांना सरोसी प्रथम आणि नवाबगंजचे ब्लॉक प्रमुख अरुण यांना औरास द्वितीय येथून उमेदवारी दिली आहे.
कुलदीप सिंह सेंगर हा बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिला आहे. २०१७ मध्ये तो भाजपाच्या तिकिटावर निवडून आला होता. मात्र उन्नाव बलात्कार प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्यानंतर भाजपाने २०१९ मध्ये त्याला पक्षातून हाकलले होते. तसेच त्याचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते.
त्यानंतर गतवर्षी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगर याला बलात्कार आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने सेंगरसह सर्व दोषींना १० वर्षांची शिक्षा सुनावली होती.