डॉ. सुनील देशमुखांच्या घरवापसीने आमदारांमध्ये अस्वस्थता; मतदारसंघाचे गणित बिघडण्याची धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:10 AM2021-06-18T08:10:22+5:302021-06-18T08:11:01+5:30
भाजपमध्ये गेल्यानंतर सुनील देशमुख यांनी अमरावतीत ७ नगरसेवकांपासून ४५ नगरसेवकांपर्यंत भाजपचा विस्तार केला. पण, कोणती पदे कोणाला द्यायची यासाठी नागपूरला विचारावे लागत असे. पक्षाच्या कोअर बैठकीमध्ये फारसे स्थान नव्हते.
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी राज्यमंत्री, काँग्रेस पक्ष संघटनेचा मोठा अनुभव असणारे व नाराजी नाट्यातून भाजपवासी झालेले डॉ. सुनील देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परत येत आहेत. मात्र, यामुळे काँग्रेसमधील विद्यमान आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ज्या ठिकाणी सध्या काँग्रेसचे आमदार आहेत त्याच ठिकाणी अन्य पक्षातील नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यामुळे त्या-त्या मतदारसंघांचे राजकीय गणित बिघडणार नाही का? असे सवाल होऊ लागले आहेत.
भाजपमध्ये गेल्यानंतर सुनील देशमुख यांनी अमरावतीत ७ नगरसेवकांपासून ४५ नगरसेवकांपर्यंत भाजपचा विस्तार केला. पण, कोणती पदे कोणाला द्यायची यासाठी नागपूरला विचारावे लागत असे. पक्षाच्या कोअर बैठकीमध्ये फारसे स्थान नव्हते. कोअर टीमची बैठक सुरू असताना बैठकीत गेलो तर आपल्या देखत विषय बदलले जातात, अशी खंत देशमुख यांनी काही नेत्यांकडे बोलून दाखवल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, आपण आपल्या मूळ पक्षात परत येत आहोत याचा जास्त आनंद आहे. भाजपमध्ये फडणवीस, गडकरी यांनी कधीही वाईट वागवले नाही. मात्र, प्रत्येक गोष्ट विचारुन करण्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी होऊ लागली. पण, पक्ष सोडताना मनात कटुता नाही, असेही ते म्हणाले.
उमेदवारीविषयी श्रेष्ठींचा निर्णय मान्य - देशमुख
आपल्या मतदारसंघात काँग्रेसच्याच विद्यमान आमदार आहेत, तेव्हा आपली लढत कोणाशी होणार? यावर देशमुख म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीला आणखी तीन वर्ष बाकी आहेत. त्यामुळे त्यावर आत्ताच काही भाष्य करणे योग्य होणार नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल.
विधानसभा मीच लढवणार
वेगवेगळ्या लोकांना घेऊन पक्ष मजबूत करणे हे पक्षाचे धोरण आहे. मी आणि देशमुख एकमेकांच्या विरोधात लढलो. त्यांचा मी १८ हजार मतांनी पराभव केला होता. देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल मी त्यांचे स्वागत करते, पण विधानसभा मीच लढवणार.
- आ. सुलभा खोडके, अमरावती
निवडून आलेल्या आमदारांना त्रास होणार नाही. देशमुख यांना पक्षात घेताना त्यांच्यासाठी वेगळा विचार केला आहे. मुकुल वासनिक यांच्यासारखे नेते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. संघटनेत त्यांना जबाबदारी दिली जाईल.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष