काँग्रेसमध्ये अस्वस्थता! राहुल गांधींनी अध्यक्षपद सांभाळावे; अन्यथा हस्तक्षेप बंद करावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 03:01 AM2020-08-23T03:01:31+5:302020-08-23T07:31:31+5:30
राजकारणात अद्याप परिपक्व नसणाऱ्या लोकांचा सल्ला राहुल गांधी घेतात, यावरून नेत्यांचा मोठा गट नाराज आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर अस्वस्थता व मतभेद आहेत आणि याचमुळे काँग्रेसची शनिवारी होणारी कार्य समितीची बैठक होऊ शकली नाही. ही विस्तृत बैठक बोलवावी, असे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे मत होते, तर विस्तृत बैठक होऊ नये, असे उर्वरित बड्या नेत्यांचे मत होते. त्यामुळे अखेर ही बैठक रद्द करण्यात आली.
पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. राहुल गांधी यांनी एक तर पुढे येऊन अध्यक्षपद सांभाळावे किंवा पक्षाच्या निर्णयांना प्रभावित करणे सोडावे, असे नेत्यांच्या एका गटाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्पष्टपणे सांगितलेले आहे.
राहुल गांधी यांना अध्यक्षपद देण्याबाबत नेत्यांत कोणतेही मतभेद नाहीत; परंतु त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी समोर यावे व थेट सर्व जबाबदारी स्वीकारावी. नेतृत्वाअभावी पक्ष आपले अस्तित्व गमावत आहे व केवळ फेसबुक- ट्विटरवर ते टिकून आहे.
फेसबुक-ट्विटरच्या आधारे राजकारण शक्य नाही. पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी ठोस कार्यक्रम घेऊन मैदानात उतरावे लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. अहमद पटेल, पी. चिदम्बरम, कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह, कमलनाथ, अमरिंदर सिंह, शशी थरूर, मनीष तिवारी आदी नेत्यांचे वरीलप्रमाणे मत आहे. १५ ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीला पक्षातील अस्वस्थतेला जोडले जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राजी करावे. ते तयार होत नसतील, तर पक्षात सामूहिक नेतृत्वाची व्यवस्था करावी.
नाराजी का?
राजकारणात अद्याप परिपक्व नसणाऱ्या लोकांचा सल्ला राहुल गांधी घेतात, यावरून नेत्यांचा मोठा गट नाराज आहे. यात रणदीप सुरजेवाला, के.सी. वेणुगोपाल, शेरगिल, अशा युवा नेत्यांचे नाव आहे. सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या प्रकारची पावले उचलली, त्यासाठीही राहुल गांधी यांच्या आजूबाजूच्या नेत्यांना जबाबदार मानले जाते.