मुंबई - औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकाधिक तापत चालला आहे. एकीकडे काल सीएमओच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याने काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. तर मंत्रिमंडळाने औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी राजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. जोपर्यंत शिवसेना सत्तेची लाचारी सोडत नाही, तोपर्यंत ती औरंगाबादचं नामांतर करू शकणार नाही, असा टोला मनसेने लगावला आहे.मनसेचे नेते संदीप देशपांडे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचताना म्हणाले की, सत्तेची लाचारी सोडल्याशिवाय शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही. औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत लागेल आणि काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. आता राज्य सरकारने विमानतळाला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. मात्र विमानतळाचं नाव कसलं बदलता आधी शहराचं नाव बदलून दाखवा, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले आहे.दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेसने आपला विरोध तीव्र केला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितंलय. शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती.
...तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही, मनसेने पुन्हा डिवचले
By बाळकृष्ण परब | Published: January 07, 2021 11:10 AM
Aurangabad News : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.
ठळक मुद्देसत्तेची लाचारी सोडल्याशिवाय शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाहीऔरंगाबादचं नामांतर करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत लागेल आणि काँग्रेसचा नामांतराला विरोध आहेविमानतळाचं नाव कसलं बदलता आधी शहराचं नाव बदलून दाखवा