नवी दिल्ली - बिहारमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी "एनडीएचा विजय झाल्यास नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत तर बिहारमध्येभाजपाचाच मुख्यमंत्री होईल. नितीश कुमार यांना दिल्लीला पाठवले जाईल" असा दावा केला आहे. तसेच नितीश कुमार आणि भाजपामध्ये डील झाल्याचं देखील कुशवाहा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
"मला वाटतं की भाजपा आणि नितीश कुमार यांच्यामध्ये डील झाली आहे. त्यानुसार नितीश कुमारही मुख्यमंत्रीपदी विराजमान न होण्याबाबत सहमत आहेत. त्यांच्या नावावर अल्पसंख्यांकांची मत घेऊन नितीश कुमार यांना दिल्लीत सेट करुन बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री करायचं, असं त्यांचं ठरलं आहे. मात्र, बिहारचे लोक असं होऊ देणार नाहीत" असं उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं आहे. बिहारमधील नेत्यांनी जनतेला निराश केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
उपेंद्र कुशवाहा यांनी "नितीश कुमार यांच्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांची 15 वर्षे बिहारमध्ये सत्ता होती. या दोन्ही नेत्यांनी बिहारच्या जनतेला निराश केलं आहे. गावांमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची अद्यापही कमतरता आहे. गरीब लोक उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये जातात. बेरोजगार लोकांनी यापूर्वी स्थलांतर केलं होते आणि आजही करत आहेत. लोक अपमानित होत आहेत, तरीही राज्याबाहेर जात आहेत. समस्येतून त्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"...तर नितीश कुमार गजाआड असतील", चिराग पासवान यांचा हल्लाबोल
लोक जनशक्ति पार्टीचे (Lok Janshakti Party) नेते चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी रविवारी (25 ऑक्टोबर) सीतामडी आणि बक्सरमध्ये प्रचार रॅली घेतली. यावेळी चिराग पासवान यांनी जेडीयू (JDU) वर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. "लोक जनशक्ती पार्टी जर सत्तेत आली तर नितीश कुमार हे गजाआड असतील" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
चिराग पासवान यांनी रविवारी एका रॅलीमध्ये "जर आम्ही सत्तेत आलो, तर नितीश कुमार आणि त्यांचे अधिकारी गजाआड असतील" असं म्हटलं आहे. बक्सरच्या डुमरावमधील एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राज्य सरकारवर निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. बिहारमध्ये दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. अवैध दारूची मोठ्याप्रमाणावर विक्री होत असल्याचं म्हटलं आहे. नितीश कुमार मुक्त सरकारसाठी लोक जनशक्ती पार्टीने भाजपा समर्थकांकडे देखील मतं मागितली आहेत.