बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:41 PM2019-05-13T22:41:04+5:302019-05-14T10:07:48+5:30
एअर स्ट्राइकबद्दलच्या मोदींच्या विधानाची खिल्ली
नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राइकवर भाष्य करताना रडारवर केलेल्या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी यावरुन मोदींवर निशाणा साधला. यानंतर आता उत्तर मुंबई मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही मोदींना टोला लगावला. मातोंडकर यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर शरसंधान साधलं.
उर्मिला यांनी त्यांच्या कुत्र्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो डोंगरावर काढण्यात आला आहे. 'आकाश निरभ्र असल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. यामुळे माझा कुत्रा रोमियोच्या कानापर्यंत रडारचे सिग्नल अगदी स्पष्टपणे पोहोचतील,' असं उर्मिला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी या ट्विटसोबत एक फनी इमोजीदेखील जोडला आहे.
Thank God for the clear sky and no clouds so that my pet Romeo’s ears can get the clear RADAR signals 🤣 pic.twitter.com/lbgtmIo59L
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) May 13, 2019
पंतप्रधान मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'एअर स्ट्राइकच्या दिवशी हवामान चांगलं नव्हतं. आकाशात ढगाळ वातावरण होतं. एअर स्ट्राइकचा दिवस पुढे ढकलायला हवा, असं मत त्यावेळी काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं. त्यावेळी ढगाळ वातावरण आपल्यासाठी सहाय्यक ठरू शकतं, असं मी त्यांना सांगितलं. ढगांमुळे आपली लढाऊ विमानं शत्रूच्या रडारला दिसणार नाहीत, असं मी तज्ज्ञांना सांगितलं आणि आम्ही त्याच दिवशी एअर स्ट्राइक केला,' असा दावा मोदींनी मुलाखतीत केला.