मुंबईअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुंबईत 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उर्मिला यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली.
"शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन आला होता. त्यावेळी ते इतकं सुंदर बोलले आणि मला त्यांचे विचार पटले. उद्धवजी मला फोनवर म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळे विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या जागा आणि भवानापर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे याचा दर्जा कुठेतरी वाढवला गेला पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनवर सांगितल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.
मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर
"उद्धव ठाकरेंचे हेच विचार मला पटले. त्यांच्या नेतृत्त्वात काम करायला मला आवडेल. महाराष्ट्र राज्य सगळ्यात पुढे आहे. त्यामुळे त्यांनी माझा विचार केला. यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते", असंही उर्मिला म्हणाल्या.
उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका
राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज उर्मिला यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.