उर्मिला मातोंडकरांना काँग्रेसने ऑफर दिलेली, त्यांनी नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:23 PM2020-10-31T16:23:28+5:302020-10-31T16:24:10+5:30
Urmila Matondakar: मराठी चेहरा आणि मराठी नाव असल्यानं उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या जागांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचेही ठरले आहे. यामध्ये एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचे. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी उमेदवारीस होकार दिल्याचे बोलले जात आहे. यावर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने विधानपरिषदेवर जाण्याची ऑफर दिलेली. मात्र, त्यांनी विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले होते. आता त्यांनी शिवसेनेवकडून जावे किंवा राष्ट्रवादीकडून याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच राज्य सरकराने मराठा आरक्षणाच्या जागा वगळून भरती करावी, अशा मागणीचा पुनरुच्चार केला.
शिवसेना का इच्छुक?
मराठी चेहरा आणि मराठी नाव असल्यानं उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. याशिवाय त्या कला क्षेत्रातून असल्यानं राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य उमेदवार आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणुकही लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
राज्यपाल नियुक्त जागांसाठी कोणते निकष आवश्यक?
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल त्या नावांना आडकाठी करू शकतात किंवा ही नावं फेटाळली जाऊ शकतात. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे संबंधही तसे फारसे सलोख्याचे नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात जाण्याची वेळ आल्यास काय तयारी ठेवावी लागेल या सर्वच बाबींवर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यामुळे नाव ठरवण्यास वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा- भाजपाचे नेते निलेश राणे
शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्यानं जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, असा टोला भाजपाचे नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.