वॉशिंग्टन – सध्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणुकीची बरीच चर्चा आहे. आज नवीन राष्ट्राध्यक्ष पदासाठी अमेरिकेत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार मनापासून काम करत आहेत. त्याचवेळी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बायडन यांच्यासाठी मतदारांना फोन करून मतदानाचं आवाहन करत आहेत. सोशल मीडियात बराक ओबामा यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ओबामा महिला मतदारांना बायडन आणि कमला हैरिस यांच्यासाठी मतदान मागत आहेत.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
बराक ओबामा यांनी एलिसा नावाच्या महिला मतदाराला फोन केला तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. ओबामांनी स्वत: ची ओळख करुन दिली आणि म्हटलं की मी बराक ओबामा बोलत आहे, मी राष्ट्रपती होतो, आठवते का? मग ती बाई हसून म्हणाली, होय मला आठवते. मग ओबामा म्हणाले की मी ज्यो बायडन यांच्यासाठी फोन बँकिंग करत आहे आणि ज्यांना मी कॉल करत आहे त्यापैकी तुम्ही एक आहात.
संपूर्ण फोन कॉल संभाषण ऐका…
मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रेटिक प्रतिस्पर्धी ज्यो बायडन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. दोन्ही उमेदवारांनी लोकांना अशावेळी मतदानाचं आवाहन केलं आहे जेव्हा राष्ट्रात कोरोना महामारीचं कडवं आव्हान उभं आहे, ज्याचा उल्लेख प्रत्येक टप्प्यात आढळून येतो.
नऊ कोटीहून अधिक मतदारांनी केलं मतदान
देशात यापूर्वी ९ कोटी ३० लाख मतदारांनी मतदान केले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर कॅरोलिना ते विस्कॉन्सिन पर्यंत पाच रॅली घेतल्या, तर बायडन आपला बहुतेक वेळ पेनसिल्व्हेनियामध्ये घालवला आहे. जिथे मिळणाऱ्या विजयामुळे ट्रम्पच्या मार्गात अडथळा ठरू शकतो.
दोन्ही उमेदवारांनी ताकद पणाला लावली
चार वर्षापूर्वी ओहायो येथे ट्रम्प यांनी आठ टक्के अधिक मतांनी विजय मिळविला होता, त्या ठिकाणी बायडन लक्ष केंद्रीत करत आहेत. आक्रस्ताळे डोनाल्ड ट्रम्प हवे की, शांत-संयत ज्यो बायडन यांच्या हाती सत्तासूत्रे सोपवावी याचा अंतिम निर्णय आज, मंगळवारी अमेरिकी मतदार घेतील. दरम्यान, लोकप्रियतेत बायडन यांनी ट्रम्प यांना पिछाडीवर टाकल्याचे चित्र विविध कल चाचण्यांतून निदर्शनास येत आहे. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे जगाचे लक्ष लागलं आहे.
अभूतपूर्व अशा कोरोना महामारीनं जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे. आतापर्यंत ९ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, हे मतदानानंतर लगेचच समजू शकणार नाही. टपाली मतांची मोजणी करण्यासाठी किमान दोन आठवडे तरी लागणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे अनेक कल चाचण्यांचे अहवाल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. त्यात आतापर्यंत बायडन आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अनेक राज्यांनी बायडन यांना झुकते माप दिल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, ट्रम्प यांची सारी मदार कुंपणावरच्या राज्यांवर आहे. या कुंपणावरच्या राज्यांपैकी अरिझोना, विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया आणि फ्लोरिडा या राज्यांनी बायडन यांना आपली पसंती असल्याचे संकेत दिले.