भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:08 AM2019-03-10T06:08:30+5:302019-03-10T06:09:36+5:30

लोकांमध्ये नाराजी; काहींचे मतदारसंघ बदलण्याचा प्रयत्न

Uttar Pradesh's minimum MP ticket is cut by BJP | भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

Next

लखनौ : भाजपाच्याउत्तर प्रदेशातील निम्म्यांहून अधिक खासदारांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही वा काहींचे मतदारसंघच बदलतील, असे सांगण्यात येत आहे. या खासदारांनी मतदारसंघाशी संपर्क ठेवला नाही, मतदारसंघातील कामे नीट केली नाहीत, असे भाजपाने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती भाजपाला वाटत आहे, असे समजते. त्यामुळेच भाजपाने हा निर्णय घेण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे.

यंदा लोकसभेसाठी बसपा,सपा व रालोद यांची आघाडी झाली आहे. या आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली या दोनच जागा सोडल्या आहेत. ही आघाडी आपल्याला चांगलाच त्रास देऊ शकेल, असे भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यातच निम्म्यांहून अधिक खासदारांची कामगिरी चांगली नाही, असे सर्व्हेतून दिसून आल्याने ते पराभूत होण्याची भीती भाजपाला वाटत आहे. यावर उपाय म्हणून अशा मतदारसंघांत नवे चेहरे देण्याचा विचार पक्षात सुरू आहे.

गेल्या निवडणुकांत उत्तर प्रदेशात ८0 पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्या पक्षासमवेत असलेल्या अपना दलाला दोन जागा मिळाल्या होत्या. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती याही पराभूत झाल्या होत्या. पण नंतरच्या पोटनिवडणुकांत भाजपाची कामगिरी अतिशय वाईट होती. सपा-बसपा-काँग्रेसने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपा उमेदवारांचा पराभव केला. आपण एकत्र आल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे, हे लक्षात आल्यानेच सपा व बसपा एकत्र आले आहेत. ३५ खासदारांची कामगिरी चांगली नसून, लोक त्यांच्यावर नाराज वा संतप्त आहेत, असा अहवाल आहे. अशांना उमेदवारी दिल्यास अधिकच अडचण होईल, असे भाजपाला वाटते.

काँग्रेसचे नव्याने प्रयत्न
भाजपाची ही स्थिती पाहून, काँग्रेसनेही सपा-बसपा आघाडीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या आघाडीने आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघांतच उमेदवार उभे न करण्याचे ठरविले आहे.
याखेरीज १८ ते २0 जागा सपा-बसपा आघाडीने आपल्यासाठी सोडाव्यात, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशात सर्वत्र तिरंगी लढती झाल्यास काही मतदारसंघांमध्ये तरी त्याचा फायदा भाजपाला होऊ शकेल, हे सपा-बसपा नेत्यांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न काँग्रेस करीत आहे.
तिरंगी लढतीमुळे सपा-बसपाचे काही उमेदवार पडतीलच, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तिरंगी लढती आघाडी वा काँग्रेसला मारक ठरतील. त्याचा अधिक फटका सपा-बसपाला बसू शकतो, असे काँग्रेस नेत्याने सांगितले. त्यामुळेच नव्याने जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे तो म्हणाला.

Web Title: Uttar Pradesh's minimum MP ticket is cut by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.